प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : राज्यात सत्तापरिवर्तन होताच आता पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना चिटकून राहण्याकडे नेत्यांचा कल असतो. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शिंदे गटात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अकोला जिल्ह्यात माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता माजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपचे कमळ हातात घेणार आहेत. सत्तेतील महाशक्तीचे ‘बळ’ आपल्या पाठीशी राहण्यासाठी नेत्यांकडून साेयीस्कर भूमिका घेण्यात येत आहेत.

राज्यात अभूतपूर्व सत्तानाट्य रंगले. सत्तापरिवर्तन होऊन शिंदे सरकार अस्तित्वात आले. राज्यात सत्ताधारी बदलताच त्याचे परिणाम जिल्हास्तरावर दिसू लागले आहेत. भविष्याचा विचार करून सत्ताधाऱ्यांच्या गोटाकडे नेत्यांची पाऊले वळली आहेत. बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधली. त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आपला भाजप प्रवेश निश्चित केला. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते २० ऑगस्टला भाजपवासी होणार आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बळीराम सिरस्कारांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा ते भारिप-बमसंचे आमदार झाले आहेत. दरम्यानच्या काळात ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले. त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बाळापूरमधून पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा असतानाच ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सिरस्कारांचे तिकीट कापले. त्यामुळे दुखावलेल्या सिरस्कारांनी राष्ट्रवादीची वाट निवडली. दोन वर्षांपूर्वीच ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते व राष्ट्रवादी देखील त्यात घटक पक्ष होता. त्यामुळे सिरकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला होता. आता राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बळीराम सिरस्कारांनी सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी सोडतांना सिरकारांनी राष्ट्रवादी सत्तेत असतांना सुचविलेली कामे झाली नसल्याचे कार्यकर्ते नाराज होते, असे कारण समोर केले. केवळ कामे करवून घेण्यासाठीच ते पक्षांतर करतात का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

बळीराम सिरस्कार माळी समाजाचे आहेत. बाळापूर व जिल्ह्यात समाजाची मोठी मतपेढी आहे. ती गठ्ठा मते पक्षाकडे वळविण्यासाठी सिरस्कार यांचा उपयोग होईल, अशी भाजपला आशा आहे. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचे नितीन देशमुख आमदार झाले. आता तो मतदारसंघ देखील ताब्यात घेऊन जिल्ह्यात ‘शत प्रतिशत भाजप’ करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या नेतृत्वाने रणनीती आखली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. त्यात बळीराम सिरस्कारांच्या रूपाने आणखी एक दावेदार वाढणार आहे. बाळापूरमध्ये पक्षाचे संघटन वाढण्यास सिरस्कारांच्या प्रवेशामुळे मदत होण्याची शक्यता भाजपकडून व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As change in ruling power in state deflection of discussion started in akola print politics news asj
First published on: 15-08-2022 at 10:24 IST