scorecardresearch

सिसोदियांच्या अटकेवर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया; अजय माकन यांचा मात्र ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप, सीबीआयचे केले कौतुक

Ajay Maken slammed AAP: काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भ्रष्टाचारातील पैसा वापरण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी केला.

Ajay makan on Manish Sisodia arrest
Ajay Maken Vs Manish Sisodia: काँग्रेस नेते अजय माकन यांनी सीबीआयच्या कारवाईचे स्वागत केले.

Ajay Maken on Manish Sisodia Arrest: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तुरुंगवास झाल्यानंतर उपमुख्यंमत्रीपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. या सर्व प्रकरणावर काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली असतानाच आता अजय माकन यांनी मात्र आपवर हल्लाबोल केला आहे. अजय माकन यांनी सांगितले की, जे लोक सिसोदियांच्या अटकेबाबत सहानुभूती व्यक्त करत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, काँग्रेसला कमकुवत करून निवडणुका लढण्यासाठी आपने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर केला. सिसोदिया यांना अटक होताच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी सीबीआयच्या कारवाईचे स्वागत केले होते, तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मात्र कुणाचेही नाव न घेता केंद्रीय यंत्रणा ‘छळ’ करत असल्याचे निवेदन दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अटकेच्या कारवाईवर टीका केली. ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा दहशत पसरवत आहेत. देशात अनेक सिसोदियांना अशाच प्रकारे अटक झाली आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. मंगळवारी दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, आम आदमी पक्षाला सुमारे १०० कोटी रुपये मिळाले, हे आता सिद्ध झाले आहे. हे पैसे आपने गोव्यात काँग्रेसविरुद्ध निवडणूक लढविण्यासाठी वापरले. त्यामुळेच सिसोदियांच्या अटकेबद्दल सहानुभूती दाखविण्याऱ्यांना मी सांगतोय की, त्यांनी काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भ्रष्टाचाराचा पैसा वापरला.

इतर काँग्रेस नेत्यांनी ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचा वापर राजकीय सूड उगविण्यासाठी आणि विरोधकांचा छळ करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाबाबत अजय माकन यांचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, केंद्र सरकारने यंत्रणांचा वापर योग्य पद्धतीने करावा, जेणेकरून सिसोदियांसारखी खरी प्रकरणे उजेडात येतील. ज्यामुळे यंत्रणांची कारवाई चुकीची वाटणार नाही.

माकन पुढे म्हणाले की, “केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांच्या विरोधात अतिशय कमी वापर करत आहे. त्यामुळेच जेव्हा एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर कारवाई होते, तेव्हा ते राजकीय सुडामुळे होत असल्याचा आरोप केला जातो. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी यंत्रणांचा काळजीपूर्वक वापर करावा, जेणेकरून यंत्रणांची कारवाई राजकीय अभिनिवेशातून झाली, असे दिसणार नाही. ज्या वेळी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खरेच कारवाई होईल, तेव्हा ती राजकीय सूडभावनेने झालेली नाही, यावर लोकांचा विश्वास बसेल.”

सिसोदिया यांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी ट्वीट करत या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली होती. सिसोदियांची अटक आणि काँग्रेसने त्यावर बचावात्मक पवित्रा घेण्याचे कारण रायपूरचे अधिवेशन ठरले. नुकत्याच काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने देशातील इतर विरोधी पक्षांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच ठरावाबाबत माकन यांची प्रतिक्रिया इंडियन एक्स्प्रेसने विचारली असता ते म्हणाले, “आप ही भाजपाची बी टीम आहे. त्यांची स्थापनाच काँग्रेसला कमजोर करण्यासाठी झालेली आहे. हा मुद्दा मी काँग्रेसच्या व्यासपीठावरूनदेखील उपस्थित केलेला आहे. काँग्रेसची दिल्लीत सत्ता असताना माकन वरिष्ठ नेते मानले जात होते. आपच्या उदयानंतर राजधानीत काँग्रेसचे वर्चस्व संपले.

माकन पुढे म्हणाले की, जे अबकारी धोरण बाद करण्यात आले, ते भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. आप सरकारने समितीच्या शिफारशींविरोधात जाऊन तीन महत्त्वाच्या बाबींना विरोध केला होता. घाऊक व्यापाराबाबत समितीने सांगितले होते की, दारूची घाऊक विक्री सरकारच्या ताब्यात असावी. यासाठी कर्नाटकचे उदाहरण दिले. मात्र आपने समितीच्या मताशी असहमती दर्शवत घाऊक व्यापारावर असलेले सहा टक्क्यांचे कमिशन वाढवून १२ टक्के केले. आता एफआयआरमध्ये याचा उल्लेख केला असून वरील सहा टक्के कमिशन परत देण्यास सांगण्यात आले आहे.

दुसरे म्हणजे, समितीने सुचविले होते की, एका व्यक्तीला दारूविक्रीचा एकच परवाना देण्यात यावा. कुणालाही एकापेक्षा जास्त दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये. यासाठी समितीने राजस्थानचे उदाहरण दिले होते. जिथे एका व्यक्तीला खुल्या लिलावाच्या माध्यमातून एकच परवाना दिला जातो. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी ५० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क ठेवण्यात आले होते. समितीने म्हटले की, राजस्थानने केवळ नोंदणी शुल्कातूनच एक हजार कोटींची कमाई केली होती. मात्र या सूचनेला केराची टोपली दाखवून आपने दिल्लीला ३२ झोनमध्ये विभागून प्रत्येक झोनमध्ये किरकोळ विक्रीचे परवाने देऊ केले, असा आरोप माकन यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 19:39 IST