scorecardresearch

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ‘मशाली’; शिवसेनेचे चिन्ह पोहचविण्याच्या तयारीचा असाही योगायोग

तुळजापूरला येणाऱ्या भवानी ज्योतीची प्रतिकृती करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज मंजूर झाला. तशी प्रतिकृती बनवून घेतली गेली. त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि तेच चिन्ह शिवसेनेला मिळाले.

As soon as the new symbol was received, Shiv Sena thackeray group immediately started campaign for Mashaal in Osmanabad
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ‘मशाली’; शिवसेनेचे चिन्ह पोहचविण्याच्या तयारीचा असाही योगायोग

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : मिट्ट काळोखाच्या विरोधातील प्रतीक म्हणून सुरेश भट यांच्या गझलांमध्ये वापरली जाणारी ‘मशाल’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिन्ह म्हणून मिळाली आणि ‘ अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळींसह चिन्ह पोहचविण्यासाठी घाई मराठवाड्यात सुरू झाली. पण एका योगायोगाची चर्चा आता उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक आहे. ती म्हणजे चिन्ह जाहीर होताच उस्मानाबाद शहरातील सांजा रोड भागात ‘मशाली’ची मोठी प्रतिकृती उभी राहिली. तुळजापूरला येणाऱ्या भवानी ज्योतीची प्रतिकृती करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज मंजूर झाला. तशी प्रतिकृती बनवून घेतली गेली. त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि तेच चिन्ह शिवसेनेला मिळाले. या कार्यक्रमाच्या छायाचित्राला आता ‘ अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळी पार्श्वसंगीत म्हणून आपसुकच कोणीतरी जोडल्या आणि चिन्हाचा प्रचार सुरू झाला.

हेही वाचा… शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणारांची उमेदवारी जाहीर केल्याने नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपची कोंडी

हेही वाचा… केवळ धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व निवडणुकीचे कारण पुढे?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार तानाजी सावंत आरोग्य मंत्री झाले. तर औरंगाबाद जिल्ह्यात संदीपान भुमरे. अब्दुल सत्तार हे दोघे जण रोजगार हमी मंत्री आणि कृषीमंत्री झाले. मराठवाड्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. परभणी जिल्हा वगळता मराठवाड्यातील अन्य सर्व जिल्ह्यात बडे नेते सत्ताधारी गटात सहभागी झाले. पण सामान्य शिवसैनिक मात्र सत्तापटावर चाललेल्या संघर्षावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू लागला. उस्मानाबाद जिल्ह्यात सेनेची बांधणी करण्यात खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सुरूवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाल्यानंतर काही तासात तसे पोस्टर्स गावागावात लागू लागले आहेत. त्याच बरोबर ‘ अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे पार्श्वसंगीत असणारी ओळ समाजमाध्यमातून ऐकविले जात आहे.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

‘मशाल चिन्ह’ उस्मानाबाद जिल्ह्यात तर अधिक शुभ मानले जात आहे. नवरात्रीमध्ये गावागाेवी सार्वजनिक नवरात्र महोत्सवासाठी ‘भवानी ज्योत’ नेण्याची पद्धत आहे. त्या ज्योतीची प्रतिकृती चौकात बसविण्याचे शिवसेना नेत्यांनी ठरविले हाेते. आता तेच पक्षाचे राजकीय चिन्ह झाल्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात आनंद साजरा होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही आता मशाल या चिन्हासह शिवसैनिकांनी प्रचारफेरी काढली. क्रांती चौकात शिवसेनेचा आवाज कोणाचा ही घोषणा झाली. पण अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या ओळीच्या ‘रिंग टोन’ही ठेवल्या जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 15:52 IST