मंगळवारी गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला आहे.
बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा आहे. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू हे लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्यांनी पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. त्यांच्या आश्रमाच्या विविध उत्पादनांना आणि अध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात होती.
राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय यांचा समावेश आहे.
हेही वाचा- लडाख जम्मू काश्मीरमध्ये असताना जास्त सुखात होतं; सोनम वांगचूक मोदी सरकारच्या धोरणांवर नाराज
नाव न सांगण्याच्या अटीवर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की, “आसाराम बापूचे प्रत्येक पक्षात अनेक राजकीय अनुयायी होते. कमलनाथ हे त्यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. पण ते भाजपा नेत्यांच्या जास्त जवळचे होते.”
२००८ नंतर आसाराम बापूच्या साम्राज्याला पहिला धक्का बसला. ३ जुलै २००८ मध्ये आसाराम बापू यांच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्या निवासी गुरुकुलमध्ये शिकणारी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह साबरमती नदीपात्रात सापडले. या घटनेनंतर स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू आणि त्याच्या आश्रमाविरोधात प्रचंड जनआंदोलन झालं. दोन्ही मुले चुलत भाऊ होते. त्यांच्या पालकांचा आरोप होता की, त्यांची मुलं आश्रमातील काही भूतबाधाला बळी पडली आहेत.
लोकांच्या तीव्र आंदोलनानंतर दोन मुले बेपत्ता झालेल्या गुरुकुलाशी संबंधित सात जणांवर गुन्हा दाखल झाला. पण दोन्ही मुलांचे पालक या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत होते. त्यानंतर २०१९ मध्ये, डी के त्रिवेदी आयोगाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला. ज्यामध्ये आयोगाने आसाराम बापूला क्लीन चिट दिली.
दरम्यान, २०१३ मध्ये खऱ्या अर्थाने आसाराम बापूच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. जोधपूर आणि गांधीनगर येथे त्यांच्यावर बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले. त्यांचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचे काही गुन्हे दाखल झाले. संबंधित सर्व गुन्ह्यांतील अनेक साक्षीदार मृत अवस्थेत आढळले. २०१४ मध्ये अमृत प्रजापती यांना राजकोटमध्ये गोळ्या घालून ठार मारले होते. ही हत्या आसाराम बापूच्या एका अनुयायाने केल्याचं समोर आलं होतं. संबंधित दोन बलात्काराच्या गुन्ह्यात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.