छत्रपती संभाजीनगर : अशोकराव चव्हाण यांना भाजपमध्ये घेणे आणि त्यांना तातडीने ‘ राज्यसभा’ देणे यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधी वातावरण तयार झाले. अन्य नाराजीच्या अनेक मुद्द्यांपेक्षाही अशोकरावांचा प्रवेश हाच पराभवाचा मुद्दा बनल्याची कबुली भाजपचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना दिली. त्यांनी भाजपला विजय मिळावा म्हणून प्रयत्न केले. मेहनतही घेतली पण त्याचा फारसा लाभ होऊ शकला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

अर्धापूर तालुक्यातील एका गावात भाजपला एकही मत मिळाले नाही, असे पूर्वी कधी घडले नव्हते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन लाख मतांनी निवडून येऊ असा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास होता. पण अशोकराव आले आणि भाजपचे कार्यकर्ते काहीसे सैलावले. महापालिकेमध्ये तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीमध्ये विरोध करण्याऐवजी अशोक चव्हाण सांगतील तोच कार्यकर्ता उमेदवार होईल, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. यातून ना भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने काम केले ना अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी. अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये येणे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तसे आवडणारे नव्हतेच. त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण निवडणुकीमध्ये नुसते काम करुन चालत नाही तर कार्यकर्त्यांमध्ये ‘तळमळ’ ही लागते. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे ती तळमळ दिसेनाशी झाली होती. खरे तर अशोक चव्हाण यांनीही मेहनत घेतली पण तोपर्यंत लोकांनी त्यांचे मत बनवले होते, असे विश्लेषण करत चिखलीकरांनी नांदेडमधील पराभवाचा कळीचा मुद्दा अशोक चव्हाण यांचा प्रवेशच होता, असे म्हटले आहे.

हेही वाचा…पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी प्रधान सचिव पदावर कायम; कोण आहेत पी. के. मिश्रा?

जरांगे यांच्यामुळे ‘ मराठा’ मतांचा फटका बसण्यापेक्षाही अशोक चव्हाण यांचा प्रवेश ना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवडला ना तो भाजपमध्ये रुचला. काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते, ‘ त्यांचा निर्णय आम्हाला अविश्वसनीय वाटत होता. अशोक चव्हाण यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही.’ याचा परिणाम असा झाला की काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांनीही भाजपला फारशी साथ दिली नाही. परिणामी सारी गणिते बिघडत गेल्याचा दावा चिखलीकर करतात. नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला भाजपचा पराभव आता अशोकराव चव्हाण यांच्या भोवताली फिरू लागला आहे.