scorecardresearch

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा खदखद? रायपूर अधिवेशनाआधीच गहलोत-पायलट गटबाजीच्या चर्चांना उधाण

छत्तीसगडमधील रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी या काळात होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

ashok gehlot and sachin pilot
अशोक गहलोत व सचिन पायलट (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छत्तीसगडमधील रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी या काळात होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या अधिवेशनासाठी राजस्थान काँग्रेसकडून तयार करण्यात आलेल्या सदस्यांच्या यादीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याच गटातील नेत्यांची बहुसंख्य नाव आहेत. दुसरीकडे सचिन पायलट यांच्या गटाला यात अगदीच नगण्य स्थान मिळालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

राजस्थान काँग्रेसने रायपूरच्या काँग्रेस कार्यकारणी अधिवेशनासाठी एकूण ७५ सदस्यांची यादी तयार केली आहे. यात ५५ निवड झालेले, तर २० स्वीकृत सदस्य आहेत. त्यात सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या केवळ दोन नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे या यादीत अशोक गेहलोत यांच्यासह त्यांच्या गटातील ७१ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोतच्या नावाचाही समावेश आहे. यावरून राजस्थान काँग्रेसवरील गहलोत यांची पकड स्पष्ट होत आहे.

गहलोत गटातील काही नेत्यांनी पाच महिन्यांपूर्वीच थेट काँग्रेसच्या हायकमांडविरोधात बंड पुकारल्यानंतरही गहलोत यांचा राजस्थान काँग्रेसवरील प्रभाव या घटनेने अधोरेखित केला आहे. गहलोत यांच्याशिवाय या यादीत राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा, विधानसभा सभापती सी. पी. जोशी, मंत्री लालचंद कटारिया, भजनलाल जाटव, प्रमोद जैन भाया, प्रताप सिंग खचरियावास, शाले मोहम्मद, ममता भूपेश, टिका राम जुली, अशोक चंदना, गोविंद राम मेघवाल, शकुंतला रावत आणि राजेंद्र यादव या नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : काँग्रेस कार्यकारणी निवडणूक आठवड्यावर आली असताना नेत्यांमध्ये संभ्रम

सप्टेंबरमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींविरोधातील बंडात सहभागी असलेल्या आणि ज्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत अशा नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 22:38 IST
ताज्या बातम्या