Maharashtra Assembly session 2026 Ashok Kharat case : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी या प्रकरणातील धक्कादायक माहिती सभागृहात मांडली. काँग्रेसचे ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात तीन बड्या सनदी अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला; तर आमदार नाना पटोले यांनी या विषयावर विधानसभेत विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. त्याशिवाय ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही पुरोगामी महाराष्ट्राचे उदाहरण देत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या या आक्रमकतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे उत्तर दिले. त्याविषयीचा हा आढावा…

विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले?

आमदार विजय वडेट्टीवार यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी धक्कादायक माहिती सभागृहासमोर ठेवली. पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातसारख्या भोंदू बाबांना अभय मिळणे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या या भोंदूचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. या विकृत प्रवृत्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेला तडा जात असून, हे खपवून घेतले जाणार नाही.सर्वात धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबाला अटक होऊ नये म्हणून शासनाचे उच्चपदस्थ आयएएस-आयपीएस आणि महसूल अधिकारी एका हॉटेलमध्ये बैठका घेत होते. जे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, तेच जर अशा भोंदूंच्या पाया पडत असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? केवळ एसआयटीकडे तपास देऊन हे प्रकरण शांत होणार नाही, यात सामील असलेल्या प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा आणि दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा : शशी थरूर यांच्या इराण युद्धावरील वक्तव्यांमुळे राजकीय वादंग का उठला? कारण काय?

नाना पटोले यांची नेमकी मागणी काय?

विजय वडेट्टीवार उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा आधीच पोलिसांमार्फत तपास केला जात असल्याने त्यावर आज सभागृहात कोणतीही चर्चा होणार नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केले. यादरम्यान त्यांनी काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली. महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. अशा राज्यात एका भोंदूबाबाचा वरचश्मा चालतो आणि त्याला सत्ताधारी मंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात. ज्या मंत्र्यांचे या भोंदूबाबाबरोबर संबंध आहेत, त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. या विषयावर विधानसभेत विशेष चर्चा घडवून आणून दूध का दूध पाणी का पाणी झालेच पाहिजे, असे पटोले म्हणाले.

भास्कर जाधव यांनी मांडली आक्रमक भूमिका

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने या प्रकरणात सरकारचा संबंध आला आहे. यात आयएएस, आयपीएस अशा बड्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे असून काही पक्षाचे प्रतिनिधीदेखील आहेत. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला होता; पण त्यावेळी सरकारने यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून चर्चेला नकार दिला, असा दावा भास्कर जाधव यांनी केला. पुरोगामी महाराष्ट्रासह छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घेता आणि त्या बुवाचे मूत्र प्यायला जाता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही, गंडे, दोरे, अंगठ्या, खडे … हे उद्योग कशाला करायचे. सरकारने या प्रकरणात गांभीर्याने भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही आमदार जाधव यांनी केली.

हेही वाचा : खरात फाईलमुळे सरकार कोसळणार? भाजपावर शिंदे गटाचा गंभीर आरोप; वाचा ५ घडामोडी…

विरोधकांच्या प्रश्नांवर फडणवीस काय म्हणाले?

अशोक खरात प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधासभेत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत जो काही प्रकार घडला आहे, तो अत्यंत गंभीर आहे. खरात याने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग आणि दिशाभूल करुन अनेक महिलांसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध असणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ती संपल्यानंतर मी याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन देईन, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यादरम्यान त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. मी नेहमीच क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाचा क्लीन चिट मिळते. या प्रकरणामध्ये ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या सभागृहातील निवेदनानंतर अशोक खरातचे आणखी किती कारनामे उघड होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.