मालेगाव : स्थानिक राजकारणात आपली ताकद सिद्ध केल्यानंतर, माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘इस्लाम’ हा पक्ष आता राज्याच्या राजकारणात झेप घेण्याच्या तयारीत आहे. मालेगाव महानगरपालिकेत मिळविलेल्या दिमाखदार यशानंतर, हा पक्ष आता केवळ एका शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आपला विस्तार करणार आहे. रविवारी मालेगाव येथे पार पडलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय संमेलनात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५ जागा जिंकल्या. जेमतेम दोन वर्षे वयाच्या या पक्षाने मालेगावात एमआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षाला चारीमुंड्या चीत करुन महापालिकेत सत्ता स्थापन केली. या लक्षवेधी कामगिरीमुळे राज्याच्या राजकारणात इस्लाम पक्ष अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहरांमध्येच नव्हे तर राज्याबाहेरील मुस्लिम समुदायालाही या पक्षाबद्दल एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मालेगावात पक्षाचे पहिले राज्यस्तरीय संमेलन पार पडले.

परराज्यांतील प्रतिनिधीही उपस्थित

या संमेलनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधींनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण यांसह एकूण १२ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांतील प्रतिनिधींनीही या संमेलनास उपस्थिती दर्शवली. या संमेलनात इस्लाम पक्षाचे ध्येय-धोरणे, मालेगाव महापालिकेत पक्षाला मिळालेले यश, आगामी काळातील रणनीती यावर मंथन करण्यात आले. मालेगाव महापालिकेत मिळालेल्या यशानंतर ‘इस्लाम’ पक्षाने राज्यभर संघटनेचा विस्तार करावा, असा ठराव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला.

एमआयएमच्या मतदार पेटीला धक्का

इस्लाम पक्षाच्या या राज्यव्यापी विस्तारामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल मतदार संघांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून मुस्लिम मतदार पेटीवर पकड असलेल्या एमआयएम पक्षाला यामुळे मोठा शह बसू शकतो,असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविला जात आहे. मालेगाव विधानसभा निवडणुकीत अवघ्या १६२ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या आसिफ शेख यांनी, महापालिका निवडणुकीत एमआयएमला धूळ चारून आपली रणनीती सिद्ध केली आहे.

धर्मनिरपेक्षतेवर भर

मालेगावात ‘एमआयएम’ हा इस्लाम पक्षाचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून ओळखला जातो. एमआयएम हा पक्ष धार्मिक राजकारण करून आपली पोळी भाजण्याचे काम करतो. हा पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप देखील आसिफ शेख हे सातत्याने करीत असतात. याउलट इस्लाम पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा आहे. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही विकासाचे राजकारण करीत असल्याचा शेख यांचा दावा आहे. मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षाच्या ३५ नगरसेवकांमध्ये तीन हिंदू असल्याचा दाखला देखील ते देतात. राज्यस्तरीय संमेलनानिमित्त पक्षाचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्धार करण्यात आला.