Himanta Biswa Sarma vs Gaurav Gogoi 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यात कोणाचे सरकार येणार याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. भाजपाने सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली असून, त्यांच्या १० वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनेही चांगलीच कंबर कसली आहे. २०१६ मध्ये भाजपाने आसाममध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन करून ईशान्य भारतात आपले पाय रोवले होते. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने आसामचा गड कायम राखला होता. यंदा सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात प्रचार मोहीम राबवली. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसनेही आपल्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती.
भाजपाची रणनीती काय होती?
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत आसाम गण परिषद आणि बोडो लँड पीपल्स फ्रंट या दोन पक्षांबरोबर युती केली. दुसरीकडे काँग्रेसने ‘आसाम संमिलित मोर्चा’ या ८ पक्षांच्या युतीच्या माध्यमातून भाजपाला तगडे आव्हान दिले. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊन राज्यात परिवर्तनाचा नारा दिला. २०२१ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे कोणत्याही प्रमुख नेत्याचा चेहरा नव्हता. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने गौरव गोगोई यांच्या रूपाने एक आक्रमक चेहरा समोर ठेवून विरोधी पक्षांची भक्कम आघाडी उभी केली. काँग्रेसने आपल्या आघाडीत आसाम जातीय परिषद आणि राईजोर दल यांसारख्या प्रादेशिक पक्षांसह ‘ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स’, ‘सीपीआय-एम’ आणि ‘सीपीआय-एमएल’ यांना सोबत घेतले आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपाच्या संघटनात्मक शक्तीला उत्तर देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला.
काँग्रेसने कशी राबवली प्रचारमोहीम?
लोकसभेत काँग्रेसचे उपनेते आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या गौरव गोगोईंनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या हक्काच्या जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून आला. या निवडणुकीत ‘एआययुडीएफ’ आणि ‘युपीपीएल’ या दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी कोणत्याही मोठ्या आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. बद्रुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील ‘एआययुडीएफ’ पक्षाची बंगाली वंशाच्या मुस्लीम बहुल भागांत मोठी ताकद आहे, तर प्रमोद बोरो यांच्या नेतृत्वाखालील ‘युपीपीएल’ पक्षाचे बोडो लँड भागात मोठे राजकीय प्रस्थ आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकांविरुद्ध तगडी तटबंदी उभी केली. सत्ताधारी भाजपाने विकास आणि आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, तर काँग्रेसने राज्यातील जनतेला सत्तापरिवर्तनाचे आवाहन करताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपाला घेरले.
आणखी वाचा : Assembly Elections 2026 : ममता, स्टॅलिन, हिमंता की विजयन? सत्तेच्या संघर्षात कोणाचे पारडे जड?
भाजपाचा प्रचार कोणत्या मुद्द्यावर?
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा प्रचार प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर आधारलेला होता. त्यांनी राज्यातील घुसखोरीचा आणि स्थलांतरितांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. प्रचारादरम्यान बंगाली वंशाच्या मुस्लीम समुदायासाठी (ज्यांचा उल्लेख ‘मिया’ असा केला जातो) भाजपाच्या नेत्यांनी वापरलेली आक्रमक भाषा चर्चेचा विषय ठरली. त्याशिवाय विकासाच्या महामार्गाचा गवगवा करीत सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली. भाजपाच्या १० वर्षांच्या सत्तेला ‘कुशासन’ म्हणत काँग्रेसने परिवर्तनाची हाक दिली. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. भाजपाच्या हातात सत्ता गेल्यापासून राज्यात भीतीचे आणि राजकीय दबावाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही काँग्रेसच्या नेत्यांनी केला. राज्यातील जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास महिलांसाठी अधिक प्रभावी योजना राबवल्या जातील आणि या योजनांची अंमलबजावणी भाजपासारखी राजकीय हेतूने प्रेरित नसेल, असे आश्वासनही देण्यात आले.
भाजपाचा विजय की काँग्रेसची मुसंडी?
आसामचे लाडके सुपरस्टार गायक झुबिन गर्ग यांचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूर येथे निधन झाले. हा भावनिक मुद्दाही काँग्रेसने प्रचारादरम्यान रेटून धरला. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार झुबिन गर्ग यांना न्याय देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. आसामी समुदायांचे प्राबल्य असलेल्या ‘अप्पर आसाम’ या भागावर यंदा सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष्य केंद्रित केले होते. २०२१ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या (CAA) विरोधात तीव्र संताप असूनही, भाजपाने या भागातील ३४ पैकी २८ जागा जिंकून वर्चस्व गाजवले होते. काँग्रेसने यावेळी ‘राईजोर दल’ आणि ‘आसाम जातीय परिषद’ (AJP) या प्रादेशिक पक्षांसोबत युती करून अप्पर आसाममधील आपला पाया पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः अहोम बहुल भागात या युतीने भाजपाला तगडे आव्हान दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे १५ जागा असलेल्या बोडो लँड प्रादेशिक क्षेत्रात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे पारडे जड दिसत आहे.
प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीवर ठरणार गणिते?
गेल्या वर्षी डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या ‘बोडो लँड टेरिटोरियल कौन्सिल’ निवडणुकीत हग्राम मोहिलरी यांच्या ‘बोडो लँड पीपल्स फ्रंट’ पक्षाने एकतर्फी विजय मिळवला होता, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही हीच लाट कायम राहील असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. बोडो लँड क्षेत्रातील १५ जागांपैकी भाजपा केवळ चार जागा लढवत असून, उर्वरित ११ जागा त्यांनी आपल्या मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजित डैमारी हे या भागातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत. काँग्रेसने बोडो लँड क्षेत्रात कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी युती केलेली नाही. खुद्द काँग्रेस नेत्यांनीही या भागात पक्षाची स्थिती कमकुवत असल्याचे मान्य केले आहे. प्रमोद बोरो यांच्या नेतृत्वाखालील ‘युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल’ हा पक्ष सध्या स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. बोडो लँडमधील आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा हा संघर्ष ‘बीपीएफ’ आणि भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रदेशातील आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रमोद बोरो यांनी बंगाली हिंदू, आदिवासी आणि कोच राजबोंगशी समुदायांकडे अधिकचे लक्ष केंद्रित केले होते.
हेही वाचा : Baramati bypoll election: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीत बारामतीकरांचाच अडथळा?
मुस्लीम मतदारांचा भाजपाला पाठिंबा?
लोअर आसाम आणि बराक व्हॅलीमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या बंगाली वंशाच्या मुस्लीम मतदारांनी २०२१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकतर्फी पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा चित्र काहीसे वेगळे आहे. अनेक मुस्लीम मतदारांना वाटते की, काँग्रेस त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेत नाही, यामुळे या समुदायात काही प्रमाणात अलिप्ततेची भावना निर्माण झाली आहे. मुस्लीम मतदारांमधील एका नवीन गटाने थेट भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला छुपा पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. बराक व्हॅली हा भाग पारंपरिकपणे भाजपाचा गड मानला जातो. येथील बंगाली हिंदू मतदार हे भाजपाचे हक्काचे मतदार आहेत. यंदाही या मतदारांचे पूर्णतः ध्रुवीकरण करून आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास भाजपाला आहे. जर सत्ताधारी पक्षाने अप्पर आसाममधील आपला गड राखला आणि बोडो लँडमध्ये मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली, तर राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, काँग्रेसची नवी युती या समीकरणांना सुरुंग लावणार का हे ४ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.
