आसाममधील भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा एक व्हिडीओ ‘आसाम भाजपा’ या ‘एक्स’ अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला. पोस्ट करण्यात आलेल्या एआय जनरेटेड व्हिडिओत हिमंता बिस्वा सरमा हे टोपी घातलेल्या दोन व्यक्तींवर रायफल रोखून धरलेल्या स्थितीत दिसत होते. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यासारखीच एक व्यक्ती टोपी घातलेल्या अवस्थेत व्हिडीओत दिसत होती. दरम्यान, मुस्लिम लोक परिधान करतात तशी टोपी घातलेल्या दोन व्यक्तींवर हिमंता बिस्वा सरमा यांनी रायफल रोखून धरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आसाममध्ये या व्हिडिओवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपावर टीका सुरू झाल्यानंतर ‘आसाम भाजपा’ या ‘एक्स’वरील सोशल मिडिया अकाऊंटवरून वादग्रस्त व्हिडीओ डिलिट करण्यात आला आहे.
‘पॉइंट ब्लॅक शॉट’ असे कॅप्शन शनिवारी पोस्ट करण्यात आलेल्या वादग्रस्त व्हिडिओला देण्यात आले होते. एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून बनवण्यात आलेल्या व्हिडिओत हिमंता बिस्वा सरमा यांचा एका रायफलने नेम धरलेला फोटो दिसत होता. तसेच सरमा यांनी टोपी परिधान केलेल्या दोन व्यक्तींवर रायफलने गोळ्या झाडल्याचे व्हिडीओत दाखवण्यात आले होते. तसेच व्हिडिओच्या शेवटी हिमंता यांची प्रतिमा एका ‘हिरो’सारखी दाखवण्यात आली होती. त्याखाली काही वाक्य लिहिण्यात आले होते. “बांगलादेशींना क्षमा नाही”, “तुम्ही पाकिस्तानला का जाता?”, “विदेशी नागरिक मुक्त आसाम”, अशी वाक्ये त्या व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात आली होती.
काँग्रेसने ‘आसाम भाजपा’ने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर टीका केली आहे. भाजपाने पोस्ट केलेला व्हिडिओ खूपच वाईट असून त्याला एक सामान्य ट्रोल समजून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच सामूहिक हिंसा आणि नरसंहारासाठी हे आवाहन आहे, अशी टीका काँग्रेसने केली. समाजात विष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या पोस्टची निंदा व जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. या प्रकरणात न्यायपालिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. दरम्यान, व्हिडिओवरून वाद वाढल्यानंतर ‘आसाम भाजपा’ने रविवारी (८ फेब्रुवारी) व्हिडीओ डिलिट केला आहे. भाजपाचे आसाममधील प्रवक्ते रंजीब कुमार शर्मा म्हणाले, “व्हिडिओ डिलिट केला आहे. त्याविषयावर आम्हाला आता काही बोलायचे नाही.” तसेच भाजपाचे आसाम सोशल मिडिया प्रमुख बिस्वजीत खोंड यांनीदेखील व्हिडिओवर भाष्य करणे टाळले.
.@BJP4India has single-handedly dragged India’s political discourse into the gutter. From @ianuragthakur’s “Goli Maaro” hate slogan and @rameshbidhuri’s Islamophobic slurs on the floor of Parliament against a fellow MP, to @BJP4Assam’s now-deleted AI video openly glorifying… pic.twitter.com/qEf462MatK
— All India Trinamool Congress (@AITCofficial) February 8, 2026
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भाजपाच्या याच सोशल मीडिया अकांऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ‘एक्स’वरील ‘आसाम भाजपा’च्या या अकाऊंटचे दोन लाखांहून अधिका फॉलोवर्स आहेत. त्यावेळी पोस्ट केलेला व्हिडिओ देखील एआयने तयार करण्यात आला होता. त्या व्हिडिओत “भाजपा विना आसाम” असे लिहिण्यात आले होते. त्यात रस्त्याच्या कडेला टोपी घातलेली एक व्यक्ती मांस कापताना दिसत होती. त्याखाली ‘बिफ लिगलायझेशन’ (बिफला कायदेशीर मान्यता मिळाली) असे लिहिलेले होते. तसेच टोपी व बुरखा घातलेले लोक विमानतळ, गार्डन, चहाचे मळे, गुवाहाटीतील क्रिकेट स्टेडियम, अहोम साम्राज्याचे वारसास्थळ असलेले रंग घर या ठिकाणी दाखवण्यात आले होते. तसेच सीमेवरील तारेचे कुंपन ओलांडतानाही काही लोक दाखवण्यात आले होते. त्याखाली ‘बेकायदेशीर स्थलांतरित’ असे लिहिण्यात आले होते. दरम्यान, या व्हिडिओने देखील त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओची दखल घेत ‘आसाम भाजपा’ व ‘एक्स’ला व्हिडिओ हटवण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यावेळी भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख खोंड ‘इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले, “आम्ही कोणत्याही एजन्सीचा वापर करत नाही. आम्ही स्वत: कंटेंट लिहितो. आम्ही राजकीय उदारमतवादी नेत्यांचा फार विचार करत नाही. आमच्या फिल्डवर्क आणि मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार आमचे कंटेंट ठरते. आसाममधील लोक फेसबुकवर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या संवेदना जाणून आमचे कंटेंट तयार केले जाते. ट्विटरवर आम्ही अधिक सक्रिय आहोत, लोक तिथे आमच्या पोस्टला लाइक करतात.”, असे खोंड म्हणाले होते.
तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
तृणमूल काँग्रेसने भाजपावर टीका केली. भाजपाने नरसंहार आणि सामूहिक हत्यांसाठी हिरवा कंदील दाखवल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. भाजपा दरवेळेस सांप्रदायिकतेचं कार्ड वापरून समाजात दुही निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाही. निवडणूक आयोग या प्रकरणी शांतपणे बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची (सीपीआय मार्क्सवादी) भाजपावर टीका
सीपीआय (मार्क्सवादी) पक्षाने म्हटले, “मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपा आसाममध्ये एसआयआर आणि घुसखोरीचे मुद्दे वापरून सांप्रदायिक भावना भडकावणारे विधान देऊन मुस्लिमांविरोधात हिंसेचं आवाहन करत आहेत. भाजपाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ हा नरसंहाराला आवाहन देणारा आहे. आसाममध्ये एखादी वाईट घटना घडण्याआधी मुख्यमंत्र्यांना अटक करणे आवश्यक आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांप्रदायिक सद्भावना बिघडू नये म्हणून हिमंता बिस्वा सरमा व त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी.”, अशी मागणी सीपीआय (एम) या पक्षाने केली आहे.

