Assam Assembly Election 2026 campaign: आसाममध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व काँग्रेस पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ९ एप्रिल रोजी मतदान, तर ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असताना आसाममध्ये प्रचाराची दिशा बदलत आहे. सामाजिक, राजकीय मुद्दे बाजूला पडत असून नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट आहेत, महिला आमदार त्यांच्या आईसह गोमांस खातात, अशा स्वरूपाच्या आरोपांची आसाममध्ये राळ उठळी आहे. तसेच नेत्यांकडून एकमेकांच्या कुटुंबियांनाही लक्ष्य केले जात आहे. आसाममध्ये भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्यावर तसेच आसाम जातीय परिषदेच्या उमेदवार कुंकी चौधरी यांच्यावर काय आरोप झाले? त्यावर कोणते स्पष्टीकरण देण्यात आले? सविस्तर जाणून घेऊयात.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमांवर कोणते आरोप?
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा व काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी ५ व ६ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आसाममध्ये प्रचाराची दिशा बदलली. सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट आहेत, यूएई, अँटिग्वा आणि बार्बुडा व इजिप्त या तीन देशांचे रिनिकी यांच्याकडे पासपोर्ट असल्याचा आरोप गोगोई यांनी केला. सरमा यांच्या कुटुंबाच्या नावावर दुबईत अलिशान मालमत्ता आहे. तसेच त्यांची अमेरिकेतील व्योमिंगमध्ये एक कंपनी देखील आहे. या मालमत्तेबाबत मुख्यमंत्री सरमा यांनी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केलेल्या शपथपत्रात उल्लेख केलेला नाही. निवडणूकीत पराभूत झाल्यास सरमा यांचे कुटुंबिय विदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने आरोप फेटाळले
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा व त्यांच्या पत्नी रिनिका भुयान सरमा यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळले आहेत. काँग्रेसने हताश होऊन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे कागदपत्र तयार करून पत्रकार परिषदेत दाखवल्याचे सरमा म्हणाले. काँग्रेसने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप ६ एप्रिल रोजी सरमा यांनी केला. सरमा ऐवजी शर्मा आडनाव, अवैध क्यूआर कोड आणि राष्ट्रीयत्वाशी संबंधित कागदपत्रांमध्येही काँग्रेसने छेडछाड केल्याचे सरमा म्हणाले.
“पाकिस्तानने तयार केलेल्या एआय मॉडेलचा काँग्रेसकडून वापर”
भारतीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तानने बनवलेल्या एआय मॉडेलचा वापर करून काँग्रेसने पासपोर्ट तयार केल्याचा दावा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या विरोधात फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचे सरमा व त्यांच्या पत्नी म्हणाल्या. निवडणुकीत खोटा प्रचार केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांना तुरूंगात जावे लागेल असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
कुंकी चौधरी व त्यांच्या आईवर गोमांस खाल्ल्याचा आरोप
काँग्रेस नेते पवन खेडा यांच्यासह हिमंता बिस्वा सरमा यांनी कुंकी चौधरी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. लंडन येथे शिक्षण घेऊन परतलेल्या कुंकी चौधरी ह्या गुवाहाटी मध्य मधून आसाम जातीय परिषद पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. ४ एप्रिल रोजी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री सरमा यांनी कुंकी चौधरी व त्यांच्या आई सुजिता गुरूंग चौधरी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. सरमा म्हणाले, चौधरी कुटुंबाने गोमांस खातानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आसाम पशुधन संरक्षण अधिनियम २०२१ नुसार गोमांसवर बंदी आहे. तसेच कुंकी सरमा व त्यांच्या आईने शर्जील इमाम सारख्या वादग्रस्त व्यक्तींना समर्थन दिले आहे, असा आरोप सरमा यांनी केला होता. मुख्यमंत्री सरमा यांनी कुंकी चौधरी यांच्या “सनातनी” असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुका झाल्यानंतर कुंकी यांच्या पालकांविरोधात एफआयआर नोंद करणार असल्याचे सरमा म्हणाले.
कुंकी चौधरींकडून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा
कुंकी चौधरी यांनी सरमा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, भाजपाने डीपफेक तंत्रज्ञानाचा आणि एआयचा वापर करून माझ्या कुटुंबियांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. सरमा यांना राजकीय भीती वाटत आहे. शहरातील पायाभूत सुविधांबाबत सरमा यांचे सरकार अपयशी ठरले आहे. तसेच गुवाहाटी शहरात मानवनिर्मित समस्यांमुळे वारंवार पूर येतो. या मुद्द्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी सरमा आरोप करत आहेत, असे कुंकी चौधरी म्हणाल्या. दरम्यान, ५ एप्रिल रोजी कुंकी चौधरी यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लढली जात असताना आता नेत्यांकडून फोरेन्सिक लॅब व न्यायालयात आणखी एक लढाई लढवली जाणार आहे.
‘मिया’ मुस्लीम समाजाला केले लक्ष्य
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसाममधील मुस्लीम समुदायातील ‘मिया’ समाजावर थेट टीका केली आहे. आसाममध्ये लोकसंख्या रचनेलाच मिया मुस्लीमांमुळे धोका असल्याचे सरमा यांनी जाहीरपणे म्हटले आहे. तसेच मतदारयाद्यांची फेरतपासणी करून पाच लाख मिया मुस्लिमांना मतदार यादीतून वगळण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. मिया मुस्लिम समाजाला लक्ष्य करताना सरमा यांनी त्याबरोबर गोमांसाचा मुद्दाही जोडला. मिया समाजाच्या आहार पद्धतीत यशस्वीपणे बदल घडवून आणल्याचे श्रेय सरमा यांनी स्वत:कडे घेतले. दरम्यान, काँग्रेसने या मुद्द्यावर भाजपाचा विरोध केला आहे. सरमा यांचे वक्तव्य असंवैधानिक आणि नरसंहारास उद्युक्त करणारे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
