लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या २५-३० नेत्यांना शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुळे उमेदवारी मिळण्यात अडचणी असल्याने हे नेते नाराज आहेत. हे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपला गळती लागण्याची चिन्हे असल्याने वरिष्ठ नेते या नेत्यांशी चर्चा करीत असून त्यांना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महायुतीचे जागावाटप अंतिम झाले नसले तरी विद्यामान आमदारांच्या जागा त्या पक्षांना जातील, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेनेला मिळालेल्या सर्व जागा शिंदे गटाला हव्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या सर्व जागांसह आणखी काही जागांसाठी अजित पवार गटाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्याने ते नाराज आहेत. हे नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंकडे गेल्यास त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी नेतेही जाण्याची शक्यता आहे. भाजपचे समरजीत घाटगे हे कागलमधून लढण्यास इच्छुक होते, पण ही जागा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी अजित पवार गटाला द्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकदा चर्चा होऊनही राजकीय भवितव्यासाठी घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला. फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र भाजपमधील अनेक नाराज नेते विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा >>>कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
अनेकांची चलबिचल
हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून निवडणूक लढविणार असून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली होती. ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे (अजित पवार) हे आमदार असून येथून लढण्यासाठी भाजपचे जगदीश मुळीक इच्छुक आहेत. कोपरगावमध्ये आशुतोष काळे (अजित पवार) आमदार असून भाजपचे विवेक कोल्हे इच्छुक आहेत. अंमळनेरमध्ये अनिल पाटील (अजित पवार) आमदार असून येथून भाजपचे शिरीष चौधरी निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. मावळमध्ये सुनील शेळके आमदार असून येथून भाजपच्या बाळा भेगडे यांना उमेदवारी हवी आहे.
विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काही नेत्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चिंता आहे. या नाराज नेत्यांशी चर्चा सुरू असून, फार तर चार-पाच नेते अन्य पक्षांत जाण्याची शक्यता आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
© The Indian Express (P) Ltd