महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री म्हणून महापालिका माझ्या अखत्यारीत होत्या तरी मला काही अधिकारच नव्हते. त्यामुळे मुंबई, ठाणे किंवा अन्य कोणत्याही शहरांमधील प्रश्न मार्गी लावू शकलो नाही, अशी कबुलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात दिली.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भयंकर आहेत. ठाणे वा मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहेत. नगरविकासमंत्री होतो तरी तेव्हा सारे अधिकार तिकडे (मातोश्री) होते. परिणामी मला मर्यादा होत्या. मुंबईतील रस्त्यांची कामे करण्याकरिता ‘एल ॲण्ड टी’ सारखी मोठी कंपनी पात्र ठरत नव्हती. आता का पात्र ठरत नव्हती हे मला माहीत नाही, असे सांगत शिंदे यांनी सारे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले.

हेही वाचा… राज ठाकरे यांच्या दौऱ्याने विदर्भात मनसे बाळसे धरणार?

मुख्यमंत्री म्हणून मला जसे अधिकार प्राप्त झाले तसे मी मुंबईच्या प्रश्नात लक्ष घातले. खड्डे हा कधीही न सुटणारा प्रश्न आहे. यामुळेच मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. येत्या दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल. मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने निधीची अडचण येणार नाही. मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये निधीचा मोठा प्रश्न आहे. यामुळे मुंबईच्या धर्तीवर सर्वच महापालिकांमध्ये सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकांना झेपणारे नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार ?

नगरविकासमंत्री म्हणून अधिकार नव्हते अशी कबुली देत शिंदे यांनी मुंबई महापालिकेचा सारा कारभार हा मातोश्रीवरूनच हाकला जायचा असे सूचित केले आहे.

हेही वाचा…भाजपचे लक्ष्य बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ,’मिशन -४५’ अंतर्गत नियोजनबद्ध तयारी

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिंदे व भाजप हे रस्त्यांवरील खड्डे वा अन्य त्रुटींवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणार हे स्पष्टच दिसते आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पराभूत करण्याची शिंदे व भाजपची योजना आहे.