मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी ३ ते ४ जणांनी हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या मोटरगाडीची काच फुटली आहे. स्वराज पक्षाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे स्वराज पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आव्हाड मुंबईहून ठाण्याला जात असताना ३ ते ४ जणांनी त्यांच्या गाडीवर काठ्या व दगड फेकले. त्यांनी आव्हाडांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न केला. सीएसटीएम येथून पूर्वमुक्त मार्गाच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा हल्ला स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा जाधव यांनी केला.