नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील पक्षांतर्गंत वर्चस्वाचा वाद विधानभा निवडणुकीच्या तोंडावरच पुन्हा एकदा उफाळून आला आहे. वडेट्टीवारांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न पटोले गटाने सुरू केला आहे. विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे या भागातील राजकारणावर प्राबल्य आहे. हाच धागा पकडून विविध पक्षाचे नेते राजकारण करतात. काँग्रेसही त्याला अपवाद नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या याच मुद्यावर काँग्रेसमध्ये दोन गटांत वाद उफाळून आला असून कुणबी नसलेल्या वडेट्टीवार यांंना लक्ष्य केले जात आहे.

वडेट्टीवार यांनी ते ओबीसी खात्याचे मंत्री असताना जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्वत:ला ओबीसी नेता म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न केला होता. तर नाना पटोले हे देखील पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत. ओबीसीच्या मुद्यावर पटोले विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष पक्षात सुरू झाला असून चंद्रपूर जिल्ह्यात तो अधिक वाढला आहे. याला काही पूर्वी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी आहे. वडेट्टीवार समर्थक चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची पटोले यांनी तडकाफडकी हकालपट्टी केली होती. त्यावरून हे दोन नेते समोरामसोर आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार यांनी पटोले यांच्याविरुद्ध दिल्ली दरबारी मोर्चेबांधणी केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वडेट्टीवार करतात. या मतदारसंघापेक्षा शेजारच्या चिमूर मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या अधिक आहे. पण, नाना पटोले यांच्या समर्थकांनी ब्रम्हपुरी येथे कुणबी अधिवेशन घेतले. त्यात वडेट्टीवार यांना लक्ष्य करण्यात आले. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मेळाव्यात मतदारसंघात बहुसंख्य कुणबी असताना अल्पसंख्याक व्यक्ती (वडेट्टीवार) या मतदारसंघाचे नेतृत्व कसे करू शकतात, असा प्रश्न केला व हे चित्र बदलण्याचे आवाहन केले. वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांनी वडेट्टीवार यांना लक्ष्य केले हे स्पष्ट होते. सध्या राजकीय वर्तुळात खासदार धानोरकर यांच्या ब्रम्हपुरीच्या भाषणाची चर्चा आहे.

हेही वाचा – कारण राजकारण : लिंगायत मतांमुळे अक्कलकोटमध्ये भाजप सुरक्षित

हेही वाचा – राज्य सरकारचे धोरण उद्योगांना मारक! आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर

खासदार प्रतिभा धानोरकर या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गटातील समजल्या जातात. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात मतभेद झाले होते. वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानीला चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धानोरकर यांच्या बाजूने भक्कम उभे होते. अखेर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. आता विधानसभा निवडणूक समोर असताना पटोले यांच्या समर्थकांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात वडेट्टीवारांना घेरणे सुरू केले आहे.