scorecardresearch

भाजपचे शहरी नेतृत्व अतुल सावेंच्या वाट्याला ग्रामीण बाजाचे खाते

कृषी, आरोग्य, रोहयो खाती मिळाल्याने मराठवाड्यात मुख्यमंत्री गटाचे वर्चस्व दिसत आहे.

भाजपचे शहरी नेतृत्व अतुल सावेंच्या वाट्याला ग्रामीण बाजाचे खाते

सुहास सरदेशमुख

मंत्रिमंडळ विस्तारात आणि खातेवाटपानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्याचेच मराठवाड्यावर वर्चस्व राहील, असे चित्र दिसून येत आहे. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत व संदीपान भुमरे यांना अनुक्रमे कृषी, आरोग्य व रोहयो खाते मिळाले. तुलनेने भाजपचे एकमेव मंत्री आणि नागरी भागातील नेतृत्व अतुल सावे यांना ग्रामीण बाजाचे खाते मिळाल्याने औरंगाबाद शहरातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.

पक्ष प्रमुखांपासून ते जिल्हास्तरावरील नेत्यांपर्यंत फटकारण्याची कार्यशैली असणाऱ्या तानाजी सावंत यांना आरोग्य खाते मिळाले तर वादानंतरही कॅबिनेट मंत्रीपद मिळविणाऱ्या अब्दुल सत्तार यांना कृषीसारखे महत्त्वाचे खाते मिळाल्यानेही राजकीय पटलावर भुवया उंचावल्या जात आहेत. संदीपान भुमरे यांचे खाते न बदलल्याने एवढा बंडाळीचा अट्टहास केला कशासाठी होता, असा प्रश्न पैठण मतदारसंघात विचारला जात आहे. विस्तारापूर्वी ‘शपथ घेण्यासाठी मुंबईला या’ असा निरोप न येताही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांना केवळ अल्पसंख्याक विभाग दिला जाईल, अशी चर्चा पेरण्यात आली होती. प्रत्यक्षात अब्दुल सत्तार यांना कृषी मंत्रालयाचा कारभार मिळाल्याने राजकीय पटलावर भुवया उंचावल्या आहेत. सत्तार आणि सावंत हे दोघेही आपले मत जाहीरपणे व्यक्त करणारे नेते अशी त्यांची ओळख असल्याने त्यांना मिळालेली खाती अधिक वजनदार असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाकाळात आरोग्य खात्याचा कारभार माजी मंत्री राजेश टोपे यांनी अतिशय नीटपणे सांभाळला.

अमित देशमुख यांच्यापेक्षा कामगिरीतील सरसपणा टोपे यांना माध्यमांसमोर नोंदविता आला. त्यामुळे आरोग्याचा कारभार परंड्याचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत कशाप्रकारे करतात, याची उत्सुकता मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातील कृषी समस्या खूप अधिक असल्याने सत्तार यांची या विभागाचे मंत्री म्हणून नियुक्ती होणे अधिक लक्षणीय मानले जाते. शिंदे गटाकडे सशक्त मंत्रालयाचा कारभार असताना शहरी ताेंडवळा असणाऱ्या अतुल सावे यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार देण्यात आला आहे. आरोग्य अथवा उद्योग खाते त्यांच्याकडे दिले जाईल असे सांगण्यात येत होते. मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणाऱ्या सत्तार, सावंत व भुमरे यांना तुलनेने सशक्त खाती तर सावे यांना ग्रामीण बाजाचे खाते मिळाले असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.