सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केव्हा, कुठे, काय करायचे आणि कसे बोलायचे याचे भान असणारा उद्योजक हा गुण जपणारे  अतुल सावे यांची मंत्रिमंडळातील वर्णी भाजपमध्ये अनेक संकेत देणारी आहे. बीड जिल्ह्यातील ‘ओबीसी’ नेतृत्व आता औरंगाबादकडे सरकले असून मराठवाड्यातील भाजपचे एकमेव मंत्री म्हणून आमदार अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. पंकजा मुंडे यांच्याकडे असणारी ओबीसी नेतृत्वाची धुरा बदलण्याच्या प्रक्रियेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून डॉ. भागवत कराड काम करत असतानाच सावे यांची निवड त्या प्रक्रियेला बळ देणारी असल्याचे मानले जात आहे.

२०१४ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून संजय केनेकर आणि अतुल सावे यांच्यामध्ये कमालीचा वाद झाला. शेवटच्या क्षणी सावे यांचे नाव निश्चित झाले आणि एमआयएम विरोधात लढणारे अतुल सावे यशस्वी झाले. ते आता खऱ्या अर्थाने औरंगाबाद शहराचे नेतृत्व करणारे असल्याने उद्योग जगतातून त्यांच्या मंत्रीपदाचे स्वागत होत आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील प्रत्येक बदलाबाबत कमालीचे आग्रही असणारे अतुल सावे एरवी उगाच कोणत्याही गोष्टीत नाक खुपसत नाहीत. औरंगाबाद पूर्व हा खरे तर अवघड मतदारसंघ. सारा हिंदू मतदार पाठिशी राहिला तरच विजयाची शक्यता वाढते. त्यामुळे सेना नेत्यांवर फार टोकदार टीका न करता सावे सर्वत्र जुळवून घेतात. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधील विविध औद्योगिक घडामोडींना चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून आता सावे यांच्याकडे पाहिले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली असली तरी कार्यकर्ते अजूनही शिवसेनेबरोबरच आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बळ देण्यासाठीही सावे यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद मिळावे म्हणून अतुल सावे यांनी माळी परिषदही घेतली होती. पण तेव्हा त्याचा फारसा उपयोग झाला नाही. उलट अशी जातनिहाय मांडणी भाजपमध्ये धोक्याची ठरू शकते असे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वसमावेशक भूमिकाच बजावली. 

देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम सुसंवाद असणारे नेते अशी सावे यांची ओळख आहे. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्याने आता औरंगाबादसह मराठवाड्यातील भाजपची धुरा त्यांच्या अंगावर येऊन पडली आहे. खरे तर मराठवाड्यातून लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर यांचे नावही चर्चेत होते. मात्र, निलंगेकर यांच्या नावाचा तूर्त विचार झाला नाही. मात्र, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका आणि उद्योगाला गती देण्याच्या नीतिचा भाग म्हणून सावे यांना मंत्रीपद मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul save is the only minister in eknath shindes cabinet from marathwada print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 21:40 IST