छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनावणी यांनी सोमवारी दुपारी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रकार बैठकीमध्ये स्पष्ट केले. या मतदारसंघात हिंदू मतांची फूट पडल्यास एमआयएम पक्ष निवडून येतो, हा पूर्वानुभव असल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ते म्हणाले. तनावणी यांनी काहीही निर्णय घेतला असला तरी शिवसेना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवेलच, असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अन्य नेत्यांप्रमाणे किशनचंद तनवाणी यांचे शक्तिप्रदर्शन होईल असे सांगण्यात येत होते. मात्र दिवाळीनिमित्त शहरातील गुलमंडी भागात कमालीची गर्दी होत असल्याने व्यापारी मंडळींनी शक्तिप्रदर्शन टाळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे साधेपणाने अर्ज दाखल करू, असे नंतर सांगण्यात आले होते. दुपारी हिंदू मतांमध्ये फूट पडून ‘ एमआयएम’ पक्ष निवडून येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला. उमेदवारी मागताना, ती मिळाल्यानंतर, ‘एबी फॉर्म’ घेताना मतांमधील फूट होईल हे माहीत नव्हते काय, असा प्रश्न तनवाणी यांना विचारला असता ते म्हणाले, ‘प्रदीप जैस्वाल आणि मी चांगले मित्र आहोत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठरल्याप्रमाणे जैस्वाल यांनी २०२४ मध्ये मला पाठिंबा द्यावा असे ठरले होते. त्यामुळे ते निवडणुकीला उतरणारच नाहीत, असे पूर्वी वाटले होते. त्यामुळेच उमेदवारी मागितली होती. पण त्यांनाही उमेदवारी मिळाली. म्हणून मी माघार घेतली.’ निवडणुकीतून माघार घेतानाची माहिती देण्यासाठी पत्रकार बैठक सुरू असताना विनायक राऊत यांचा दूरध्वनी आला होता. संजय राऊत, चंद्रकांत खैरे या नेत्यांचेही दूरध्वनी आले होते. त्यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा : जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
आजही शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचा मी जिल्हाप्रमुख आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे ) गटाला पाठिंबा दिलेला नाही. आजही मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराचा प्रचार करू. माझा निर्णय मान्य नसेल तर माझी पक्षातून हकालपट्टीही होऊ शकते, हे मला माहीत आहे, असेही तनवाणी म्हणाले.
२०१४ मधील स्थिती?
औरंगाबाद मध्य मतदारसंघात २०१४ मध्ये किशनचंद तनवाणी यांना ४०,७७० मते मिळाली होती. तेव्हा तनवणी भाजपचे उमेदवार होते. प्रदीप जैस्वाल हे तेव्हा शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांना ४१,८६१ मते मिळाली होती. या मतदारसंघात इम्तियाज जलील यांना ६१,८४३ मते मिळाली होती.
हेही वाचा : नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून डॉ. संतुक हंबर्डे
किशनचंद तनवाणी यांना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात येत असून, या पदाची जबाबदारी विधानसभा संघटक रेणुकादास उर्फ राजू वैद्य आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यावर संयुक्तरीत्या सोपवण्यात आली. ऐनवेळी पक्षाचे स्थानिक नेते बाळासाहेब थोरात यांना मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद