scorecardresearch

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, राष्ट्रवादीकडून ‘जुने पेन्शन’ योजनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी

निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात जुनी पेन्शन हाच मुद्दा पुढे केला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, राष्ट्रवादीकडून ‘जुने पेन्शन’ योजनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ‘जुनी पेन्शन’ योजना हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवून जाहीर प्रचार करायचा आणि छुप्या प्रचारात मतदारांमधील पाहुणे- राऊळे शोधायचे अशी रणनीती आखली जात आहे. तीन वेळा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विजयी ठरलेले आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजपने नवखा उमेदवार उभा केल्याने त्यांच्या विरोधात असणारी नाराजी मतांमध्ये रुपांतरित करण्याचे इंजिन भाजपाला सापडलेले नाही. निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात जुनी पेन्शन हाच मुद्दा पुढे केला आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती वेतन देता येणार नाही, या शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षण क्षेत्रातील प्रतिक्रिया तीव्र आहेत. शिक्षक सेवक आणि विना अनुदानित किंवा २० किंवा ४० टक्के अनुदानावर नोकरी करणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती २००५ पूर्वीची असल्याने जुन्या पेन्शन योजनेची मागणी लावून धरली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यासाठी आंदोलनेही झाली. पण कोविडमुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पूर्णत: खालावली असल्याने  ही पेन्शन योजना लागू करणे शक्य नव्हते अशी भूमिका घेण्यात आली.

हेही वाचा >>> पश्चिम बंगाल किंवा केरळप्रमाणे राज्य सरकार ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणार का?

२००५ पूर्वी नियुक्त राज्यातील  पहिली ते १२ वी पर्यंतची शिक्षक संख्या  २५ हजार ६७२ एवढी आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये हा विषय जाहीरपणे चर्चेत आणला जात आहे. सत्ताधारी भाजपकडून हा प्रश्न सोडवू असे जाहीर आश्वासन देण्यात आले नाही. या योजनेची अंमलबजावणी करता येऊ शकेल का, याची चर्चा करण्यासाठी नेत्यांबरोबर बैठक करून देऊ, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यामुळे प्रचारात राष्ट्रवादीकडून ‘जुनी पेन्शन’ हा मुद्दाच चर्चेत आणला जात आहे. एका बाजूला हे सारे करताना पाहुणे-राऊळे शोधण्याचे पारंपरिक हत्यारही चर्चेत आले आहे.

हेही वाचा >>> राष्ट्रवादीचे नेते सर्वत्रच वादग्रस्त, खासदार अपात्र

  काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनीताई पाटील यांच्या जवळील व्यक्ती म्हणून परिचित असणारे किरण पाटील यांना भाजपने दोन महिन्यांपूर्वी प्रवेश देत उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना रजनीताई राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर याव्यात यासाठी प्रयत्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करणार आहोत, हा संदेश देण्यासाठी रजनीताई पाटील यांनीही आवर्जून शिक्षक मतदारांसमोर विक्रम काळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे भाषण केले. ‘किरण पाटील हे रजनीताई पाटील यांचे पाहुणे असले तरी मीही पाहुणा आहे, आणि तोही आईच्या नात्यातून’ असा उलगडा विक्रम काळे यांनी केला. शिक्षक मतदारसंघातील प्रचारात पाहुणे: राऊळे असाही प्रचाराचा मुद्दा आवर्जून केला जात आहे.

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या खासदाराच्या विरोधात भाजपकडून संभ्रम

  शिक्षक मतदारसंघावर एकेकाळी मराठवाडा शिक्षक संघाचाही प्रभाव होता. या मतदारसंघात या संघटनेचे  राजाभाऊ उदगीरकर, डी. के. देशमुख, पी. जी . दस्तुरकर. प. म. पाटील  यांनी विजय मिळवला होता.  पण पुढे ही संघटनाच कमकुवत झाली.  प्रत्येकाचा एक गट झाला. वसंतराव काळे यांनी या मतदारसंघात विजय मिळविला आणि पुढे विक्रम काळे यांनी पुढे तीन वेळा  या मतदारसंघात विजय मिळविला. सातत्याने विजय मिळविल्यानंतर मतदारांमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधीविषयीची नाराजी आपल्या बाजूने वळवून घेता येते का, याचे गणित भाजपाकडून घातले जात आहे. पण आयात केलेला नवखा उमेदवार यामुळे महाराष्ट्र शिक्षक परिषदेमध्येही नाराजी आहे. त्यामुळे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होईल असे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदीप सोळंके यांनी भरलेला उमेदवारी अर्ज काढून घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांना जाहीरपणे करावे लागले. याचे अर्थ अंतर्गत कुरबुरीशी जोडून पाहिला जात आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जाहीर प्रचारात मात्र ‘ जुनी पेन्शन’योजनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 16:10 IST

संबंधित बातम्या