scorecardresearch

Premium

उद्धव ठाकरेंचा भाजपविरोधात आक्रमक आणि पाणीप्रश्नावर नरमाईचा सूर

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर महापालिकेत शिवसेना दोन पाऊल पुढे एक मागे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यामध्ये विरोधकांवर टीका केली (संग्रहीत छायाचित्र)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यामध्ये विरोधकांवर टीका केली (संग्रहीत छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातमोहीम भाजपने राबवली होती. आता ‘कुठे नेऊन ठेवला आहे देश माझा’ हा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधातील आक्रमता औरंगाबादच्या सभेत पुन्हा दाखवली. याच सभेत मनसेचा भोंगेविरोध, एमआयएमच्या नेत्यांचे औरंगजेबाच्या थडग्यावर नतमस्तक होणे आणि राणा कुटुंबाची हनुमान चालिसा या तिन्ही घटना भाजपच्या सुपाऱ्या असल्याची संभावना करत या गोष्टींना फारशी किंमत देत नसल्याचे ठाकरे यांनी सूचित केले. ‘हृदयात राम आणि हाताला काम’ या शिवसेनेच्या हिंदुत्वाला नवा आयाम देणाऱ्या घोषणेसह औरंगाबादच्या प्रगतीसाठी दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्टयाच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही उद्योगवाढीला मदत करणारा मध्यवर्ती प्रकल्प औरंगाबादमध्ये लवकरच येईल असे सांगितले. सफारी पार्क, रस्ते तसेच उद्योगातील गुंतवणूक या विकास प्रक्रियाबाबतची गतीचे सूतोवाच करताना औरंगाबादकरांच्या कळीच्या पाणीप्रश्नावर भाष्य केले. पाणी समस्येवर प्रामाणिकपणे औरंगाबादकरांना सामोरे जात असल्याचे सांगून त्यांनी हात दगडाखाली अडकले असले तरी कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा संदेश दिला. पण महापालिकेत सत्तेचा मोठा कालावधी उपभाेगणारी शिवसेना पाणीप्रश्न वगळून आक्रमक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय घडले काय बिघडले ?

औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दोन दशकांपासून कायम असून त्याचे अपश्रेय शिवसेनेच्या पारड्यात टाकण्यासाठी भाजपकडून खासे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नी काय बोलणार याची उत्सुकता कायम होती. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना विरोधी रोष वाढता ठेवण्यासाठी पाणी समस्या हाच मुद्दा केंद्रभूत ठेवावा लागेल, असे ठरवून भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. शहरातील रस्ते, कचरा या समस्या सोडविण्यात महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला तसे यश आले नव्हतेच. पण प्रशासकीय कार्यकाळात केवळ पालकमंत्री सुभाष देसाईच्या यांच्या प्रशासनावर अंकुश ठेवण्याच्या कार्यशैलीमुळे अनेक समस्यांवर औरंगाबाद महापालिकेला यश आले. त्यात रस्ते, कचरा या समस्यांचा समावेश आहे.

‘शहर’ अशी संकल्पना विकासही अलिकडे होऊ लागला. त्यात सायकल मार्गिकांचा समावेश असो किंवा शहरी असा तोंडवळा विकसित करण्याचे प्रयत्न असोत, ते घडविले गेले. पण याचे श्रेय महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांना देता येणे अवघड आहे. ते श्रेय शासन आणि पालकमंत्र्यांचे. पण मार्ग निघत गेला आणि सेनेविषयीची प्रतिमा काहिशी बदलली. ती बदलविण्यात पुढाकार घेणाऱ्या आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यावरही ते शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केला तो यामुळेच. त्यामुळे पाणीसमस्येवर उत्तरे द्यावीत, असा राजकीय पट विरोधकांनी मांडला. यात शिवसेनेची कोंडी होईल असे दिसत आहे. मात्र, या प्रश्नी प्रामाणिकपणे काम करतो आहोत असा संदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वारंवार द्यावा लागतो हे स्थानिक शिवसेनेचे अपयश म्हणता येईल. त्यामुळे पाणी प्रश्नी शिवसेनेचे बरेच काही बिघडलेलेच आहे.

राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रासह चार राज्यांमधील मतांची आकडेमोड! नेमकी कशी आहेत राजकीय गणितं?

कचरा समस्येमुळे औरंगाबादची नाचक्की देशभर झाली होती. पण ती समस्या सोडविण्यात आता यश आले आहे. कचऱ्याच्या गाड्या विकत घेण्यापासून ते ओला व सुका कचरा वेगळा करण्यापर्यंतची सवय लोकांना लावण्यात आली. पण त्यातही सेनेच्या किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा होता असे नाही. ही सारी कामे प्रशासकीय गतीने होत राहिली. करोना नसता तर समस्या सुटल्या असत्या का? हा प्रश्न अजूनही गुंताच निर्माण करतो. पण जाणीवपूर्वक बदल घडवत असल्याचा संदेश उद्योग विभागाकडून देण्यात आला. शहरातील रुग्णालय उभारणी, कोविडसाठी प्रयोगशाळेत लागणारी यंत्रसामुग्री असो पालकमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पण अडचणीची आणि मतदारांवर परिणाम करणारी पाणी योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागतील असे सांगण्यात आल्याने महापालिका निवडणुकीत पाणीप्रश्न पुन्हा डोके वर काढेल, हे नक्की.

सतत निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या सात- आठ नगरसेवकांनी टक्केवारी घेऊन महापालिका चालविली या विरोधकांच्या अरोपावरही शिवसेनेला विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण केलेला रोष कमी करण्यात काहीसे यश मिळत असले तरी तो पाणीप्रश्न वगळून असल्याने त्यावरून राजकारण सुरूच राहील असे दिसत आहे.

जमिनीवरील कार्यकर्ता…आमश्या पाडवी!

संभाव्य राजकीय परिणाम ?

‘एमआयएम’ आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांबरोबर महापालिकेत लढताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा व सभेतील गर्दीचा उपयोग किती? असे प्रश्न आता विचारले जाऊ शकतात. शिवसैनिकांना धर्मद्वेष कधी शिकवला गेला नाही. ते रक्तदान आणि बंद सारख्या कार्यक्रमातच पुढाकार घेतात, असे सांगत शिवसेना काहिशी बदलत असल्याचे संकेत औरंगाबाद शहराचा ‘तानाबाना’ सुधारण्यास मदत करणारे ठरतील. एरवी हिरवा साप वगैरे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नव्हते. रझाकारी वृती जिथे ते शिवसेना वार-करी असे पोस्टर सभेपूर्वी होते. पण थडग्यावर जाऊन नतमस्तक होण्याची एमआयएमची कृती ही सुपारीचा भाग ठरवून केलेली टीका वगळता मुख्यमंत्र्यांनी एमआयएमबद्दल बोलणे टाळले. भाजप हाच टीकेचा केंद्रबिंदू ठेवल्याने महापालिका निवडणुकीत सेना- भाजपमधील संघर्ष केवळ फलकबाजीपुरता राहील असे वाटत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2022 at 17:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×