लोकसभा निवडणूक होण्यासाठी अवघ्या दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. अशात जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पूर्ण कधी होईल याची वाट विरोधातले पक्ष पाहात आहेत. ज्यांची विचारधारा सामायिक आहेत असे पक्ष या गोष्टीची वाट बघत आहेत. जेणेकरून विरोधकांना एकत्र येता येईल.
२०२४ मध्ये भाजपाच्या विरोधात येणार महाआघाडी
बिहारमध्ये काँग्रेस आणि जदयू चं सरकार आहे. महाराष्ट्रात जो सत्ताबदल झाला त्यानंतर भाजपाची साथ सोडून नितीश कुमार महाआघाडीसोबत गेले. त्यानंतर आता त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. भाजपाला २०२४ च्या निवडणुका जिंकू द्यायच्या नसतील तर सगळ्या विरोधी पक्षांची मोट बांधणं आवश्यक आहे. हे पक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपण्याची वाट पाहात आहेत असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा व्यक्तीगत प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा विरोधक एकत्र येतील तेव्हा काँग्रेसने सोबत आलं पाहिजे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नितीश कुमारांनी सोडली भाजपाची साथ
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली. त्यानंतर आरजेडी आणि काँग्रेस यांच्यासोबत जात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवलं. भाजपाला त्यांची राष्ट्रीय महत्वकांक्षा पूर्ण करायची असल्याने ते इतर मित्र पक्षांचा वापर करत आहेत असाही आरोप नितीश कुमार यांनी केला होता. आम्ही आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपण्याची वाट बघत आहोत. त्यानंतर विरोधी पक्षांची एक बैठक होईल. त्या बैठकीत बोलावलं जाईल याची वाट आता मी पाहतो आहे. आम्ही लोकसभेच्या दृष्टीने कसं लढायचं याची रणनीती ठरवण्यासाठीच बैठक घेणार आहोत असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.