UP Election 2027 : उत्तर प्रदेशातील सांस्कृतिक भूमी असलेल्या अयोध्येत भाजपाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतरही भाजपाचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एकमेकांना राम मंदिराच्या भूमीतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चुरस रंगणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरामुळे या मतदारसंघाला देशाच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्येसह पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मात्र, फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आणि अयोध्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. गेल्या तीन दशकांत अयोध्या विधानसभा मतदारसंघात बहुतांश वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. तरीही प्रत्येक निवडणुकीत पक्षाला मिळणारा पाठिंबा आणि मताधिक्य सारखे राहिलेले नाही. २०२४ मध्ये राम मंदिर उभारणीचा मुद्द्यावर भाजपाने जोरदार प्रचार केला; पण तो त्यांच्या पथ्यावर पडला नाही. मतदारांचा कल का बदलला, याची चर्चा सुरू झाली. आता विधानसभा निवडणुकीत अयोध्येतील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात, याकडे लक्ष असणार आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक, असे दोघेही तयारीला लागले आहेत. त्यातच एकमेकांवर शाब्दिक वार देखील केले जात आहेत. अयोध्येत नुकत्याच पार पडलेल्या भागवत कथेच्या कार्यक्रमात अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले. विजयाची खात्री असेल, तर त्यांनी अयोध्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे यादव म्हणाले.
अखिलेश यांच्या या आव्हानाला योगी आदित्यनाथ यांनी ‘तुम्हीही या, मीही येतो. एकदा नशीब आजमावून पाहू,’ अशा शब्दांत प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत अयोध्येतून हे दोन्ही नेते आमने-सामने येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, अयोध्या हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही केवळ निवडणूक लढविण्यासाठी दौरे करत नसून, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दौरे करतो.
योगी आदित्यनाथ सध्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दुसरीकडे, अखिलेश यादव २०२२ मध्ये करहलमधून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कन्नौजमधून विजय मिळवल्यानंतर त्यांनी करहलची आमदारकी सोडली होती. त्यामुळे अयोध्येतून निवडणूक लढविण्याचे दोन्ही नेत्यांचे आव्हान प्रत्यक्षात उतरते का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत योगी आदित्यनाथ म्हणाले की, राजकीय समर्थकांच्या माध्यमातून लढण्यापेक्षा थेट आमने-सामने लढत झाली पाहिजे. भाजपामधील सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आदित्यनाथ यांचा रोख अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांच्याकडे होता. अखिलेश यादव ज्या भागवत कथेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्याचे आयोजन पांडे यांनी केले होते.
समाजवादी पक्षाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अयोध्येतून पवन पांडे यांची उमेदवारी निश्चित केली होती. लखनौमधील ५ ऑगस्टच्या एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांनी पांडे अयोध्येतून निवडणूक लढवतील, असेही जाहीर केले होते. पांडे हे ब्राह्मण समाजातील नेते असून, त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या जमीन खरेदी व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, मंदिराला मिळालेल्या देणग्यांमध्ये कथित तफावत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अयोध्येतील संभाव्य लढतीत केवळ दोन प्रमुख नेत्यांचे आव्हान-प्रतिआव्हानच नव्हे, तर राम मंदिर ट्रस्टच्या कारभाराचा मुद्दादेखील राजकीय चर्चेचा मुद्दा ठरू शकतो.
अयोध्येत भाजपाचे भवितव्य अधांतरी?
अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद नेहमीच सारखी राहिलेली नाही. गेल्या आठ विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, तर २०१२ पर्यंत या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते. मात्र, याच वर्षी समाजवादी पक्षाच्या तेज नारायण पांडे ऊर्फ पवन पांडे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लल्लू सिंह यांचा पराभव केला. त्यामुळे भाजपाच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच धक्का बसला.
भाजपाला १९९१ मध्ये अयोध्येत सर्वाधिक मते मिळाली होती. त्या काळात रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला होता. या निवडणुकीत लल्लू सिंह यांना ५१.३ टक्के मते मिळाली आणि त्यांनी ३० हजार ४०० च्या मताधिक्क्याने विजय मिळवला. मात्र, बाबरी मशीद पाडल्यानंतर काही महिन्यांनी पार पडलेल्या १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची आघाडी कमी झाली. लल्लू सिंह यांनी जागा राखली; पण पक्षाची मतांची टक्केवारी ४७.२४ टक्क्यांवर आली आणि विजयाचे अंतर नऊ हजार २३८ मतांपर्यंत घटले. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या समाजवादी पक्षाने जवळपास ४० टक्के मते मिळवीत दुसरे स्थान पटकावले. त्यावरून रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात भाजपाला मोठा पाठिंबा मिळाला असला तरी अयोध्येत समाजवादी पक्षानेही आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती.
लल्लू सिंग यांनी पुढील निवडणुकांमध्येही अयोध्येमधील आघाडी कायम ठेवली; मात्र भाजपाच्या मतांची टक्केवारी सातत्याने घसरत गेली. १९९६ मध्ये भाजपाला ४५.६१ टक्के, २००२ मध्ये ३८.७२ टक्के, तर २००७ मध्ये जवळपास ३७ टक्के मते मिळाली. म्हणजेच रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात मिळालेला मोठा जनाधार पुढील निवडणुकांमध्ये कायम राखण्यात भाजपाला अडचणी आल्या.
२०१२ मध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते. या काळात समाजवादी पक्षाने भाजपाच्या विरोधातील नाराजीचा फायदा घेतला. समाजवादी पक्षाने पवन पांडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी लल्लू सिंह यांचा पाच हजार ४०४ मतांनी पराभव केला. पांडे यांना २८.७४ टक्के मते मिळाली; तर भाजपाची मतांची टक्केवारी घसरून जवळपास २६ टक्क्यांवर आली.
मात्र, २०१७ मध्ये भाजपाने पुन्हा अयोध्येची जागा जिंकली. पक्षाचे उमेदवार वेद प्रकाश गुप्ता यांना ४९.५६ टक्के मते मिळाली आणि त्यांनी पवन पांडे यांचा ५० हजार ४४० मतांनी पराभव केला. २०२२ मध्येही गुप्ता यांनी जागा राखली; मात्र भाजपची मतांची टक्केवारी घसरून सुमारे ४९ टक्के झाली. त्याच वेळी विजयाचे अंतरही ५० हजारांवरून कमी होऊन १९ हजार ९९० मतांवर आले; तर पवन पांडे यांची मतांची टक्केवारी वाढून ४०.४ टक्क्यांवर पोहोचली. त्यामुळे भाजपाने जागा राखली असली तरी समाजवादी पक्षाने अयोध्येत आपला मताधार वाढविल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
२०१७ मध्ये भाजपाने अयोध्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला. पक्षाचे उमेदवार वेद प्रकाश गुप्ता यांना ४९.५६ टक्के मते मिळाली आणि त्यांनी समाजवादीच्या पवन पांडे यांचा ५० हजार ४४० मतांनी पराभव केला. २०२२ मध्येही गुप्ता यांनी ही जागा राखली; मात्र भाजपाच्या मतांची टक्केवारी घसरून सुमारे ४९ टक्क्यांवर आली. त्याच वेळी विजयाचे अंतरही कमी होऊन १९ हजार ९९० मतांवर आले; तर पवन पांडे यांची मतांची टक्केवारी वाढून ४०.४ टक्क्यांवर पोहोचली.
विधानसभा निवडणुकीतील या बदलत्या आकडेवारीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फैजाबाद मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले होते आणि शहरात अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामेही सुरू झाली होती. तरीही समाजवादी पक्षाचे दलित नेते अवधेश प्रसाद यांनी भाजपाचे लल्लू सिंह यांचा पराभव केला. राम मंदिर आणि विकासकामांचा प्रचार करूनही भाजपाचा पराभव झाल्याने अयोध्येतील मतदारांचा कौल नेमका कोणत्या मुद्द्यांवर ठरतो, याबाबत चर्चा सुरू झाली.
अयोध्येतील जातीय समीकरण
अयोध्येतील निवडणुकीत जातीय समीकरणांसोबतच स्थानिक प्रश्नही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि त्याखालोखाल ब्राह्मण मतदारांचा प्रभाव आहे; तर मुस्लिम आणि यादव समाज समाजवादी पक्षाचा पारंपरिक मताधार आहे. दुसरीकडे, भाजपाला उच्चवर्णीयांसह कुर्मी, निषाद, मौर्य व राजभर यांसारख्या ओबीसी समाजातील काही घटकांचा पाठिंबा मिळतो.
अयोध्येतील या सामाजिक समीकरणांमुळे भाजपापुढे आव्हान उभे राहते, असे पक्षातील एका नेत्याने म्हटले आहे. यादव आणि मुस्लिम मतदार पारंपरिकरीत्या सपाला मतदान करतात. त्यातच सपाने स्थानिक ब्राह्मण उमेदवार दिल्यामुळे ब्राह्मणांसह अन्य उच्चवर्णीय मतदारांच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दलित मतदारांचा कौलही निर्णायक ठरू शकतो, अशी माहिती या नेत्याने दिली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला असला तरी अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपाने सपापेक्षा ४,६६७ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, याच लोकसभा मतदारसंघातील दरियाबाद, रुदौली, मिल्कीपूर व बिकापूर या अन्य चार विधानसभा मतदारसंघांमध्ये सपाला आघाडी मिळाली. त्यामुळे संपूर्ण फैजाबाद मतदारसंघातील निकाल आणि अयोध्या शहरातील मतदारांचा कौल यांमध्ये फरक दिसून आला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अयोध्येतील नागरी सुविधांचे प्रश्नही पुन्हा चर्चेत आले. शहरात गटारांची कामे आणि रस्त्यांची दुरुस्ती यांसारखी काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शहरातील बहुतांश मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत; मात्र, काही कामे अजूनही सुरू आहेत.
समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना दावा केला की, निवडणूक निष्पक्षपणे झाली, तर अयोध्येत सपाला विजय मिळेल. लोकसभा निवडणुकीत अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मताधिक्य घटले होते, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपाच्या सरकारमधील कथित भ्रष्टाचार, मूलभूत सुविधांचा अभाव आणि पक्षाच्या नेत्यांची व्हीआयपी संस्कृती यांमुळे नागरिक नाराज असल्याचा आरोप पांडे यांनी केला. अधिकारी आणि मालमत्ता व्यवहार करणारे लोक सामान्य नागरिकांची लूट करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपा सरकार विकासकामांबाबत खोटे दावे करीत असल्याचा आरोप करत, अयोध्येतील जनतेला प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
