Nripendra Misra on Ayodya Ram Mandir : ५ जून २०२५ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी अयोध्येचा राजा म्हणून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, राम मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं. “इतिहासातील चुका दुरुस्त करण्यालाही काही मर्यादा असतात. एकदा लोकांच्या लक्षात आले की तो काळ पूर्णपणे निघून गेला आहे आणि ते वर्तमानात राहून भविष्याचे स्वप्न बघत आहेत, तर समाज अधिकच सकारात्मक होऊन विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करेल, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही भाष्य केलं. नृपेंद्र मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील प्रधानसचिव म्हणून काम पाहिलं आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये राम मंदिर बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राम मंदिराच्या नियोजन आणि बांधकामाची संपूर्ण जबाबदारी मिश्रा यांनी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे.
“मंदिर-मशिदीच्या वादात नेहमीच न्याय मागता येत नाही”
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मिश्रा म्हणाले, “राम मंदिर सर्व समाजाने स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्वाळा दिल्यामुळेच हे शक्य झालं आहे. भूतकाळातील संघर्ष जसे की मंदिर-मशिदीचे वाद यामध्ये नेहमीच न्याय मागता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा स्पष्ट संदेश होता की मंदिरातून दिला जाणारा संदेश नकारात्मक असू नये.”
पंतप्रधान मोदींचा काय संदेश होता?
राम मंदिरातून नकारात्मक नव्हे, सकारात्मक संदेश जावा, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यांनी वारंवार सांगितले की, जर नकारात्मकतेचा संदेश पुढे गेला, तर तरुण पिढीला कमीपणा वाटेल. सनातन धर्म हरला अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे पंतप्रधानांना या सर्व गोष्टी टाळायच्या होत्या. तरुण पिढीला हे समजले पाहिजे की, आपण आपले धर्मस्थळ परत मिळवले आणि जपले,” असंही मिश्रा यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, कोणत्याही ठिकाणी आम्ही हे नमूद केले नाही की, अमुक-अमुक व्यक्तीने मंदिर पाडले होते.

धार्मिक महत्त्वामुळे, अयोध्या या वर्षीही भारतीय प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय राहिली. राम मंदिराच्या उभारणीनंतर हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनले आहे. येथील संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म पर्यटकांना आकर्षित करत असे. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
“काही गोष्टींचा हट्ट सोडून द्यायला हवा”
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देशभरातील इतर स्थळांवरही मंदिरे उभारण्यासाठी नवीन दावे होतील का, असा प्रश्न नृपेंद्र मिश्रा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मी याची जबाबदारी सरकारवर टाकत नाही. ही जबाबदारी वेगवेगळ्या सामाजिक गटांवर, निवडून आलेल्या किंवा पराभूत झालेल्या प्रतिनिधींवर आहे. त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे,” असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, प्रत्येक मुद्दा दुरुस्त करण्याला काही मर्यादा असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की, जी वेळ निघून गेली आहे, ती परत येणे शक्य नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टींचा हट्ट सोडून द्यायला हवा. एकदा समाजाच्या लक्षात आले की तो काळ निघून गेला आणि आणि वर्तमानात राहून भविष्यातील स्वप्न साकार करायला सुरुवात केली, तर समाज अधिक सकारात्मक बनेल आणि तो विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष देईल.”
देशाने पुढे कोणत्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे?
भारत लवकरच जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर, देशाने पुढे कोणत्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, यावर नृपेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाचे विचार मांडले. “देशाला आता भूतकाळाकडे नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण कदाचित जपानला मागे टाकले असेल, पण तिथे आपल्यासारखे इतके गरीब लोक नाहीत. तिथे पोषणाचा अभाव नाही, ना शिक्षण व आरोग्याच्या समस्या आहेत. मी म्हणतो की आपण सर्वाधिक दूध उत्पादन करतो; पण सगळे दूध घेतात का?” असा प्रश्नही मिश्रा यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा : युद्धविराम आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे आरोप केंद्रीय मंत्र्यांनी कसे फेटाळून लावले?
केंद्र सरकारने ‘या’ तीन मुद्द्यांकडे लक्ष्य द्यावे
देशाच्या विकासाठी केंद्र सरकारने आरोग्य व रुग्णालये, शिक्षण आणि ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण या मुद्द्यांवर अधिकच लक्ष दिलं पाहिजे, असे मिश्रा यांनी म्हटलं आहे. “माझी प्रार्थना हीच आहे की, या तीनही गोष्टी साध्य करण्यात देशाला लवकरात लवकर यश मिळावं,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणासाठी २०२३ मध्ये एका स्थानिक न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाली आणि आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
संभलमधील हिंसाचाराबद्दल मिश्रा काय म्हणाले?
संभलमधील हिंसाचार प्रकरणावर मिश्रा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “ही एक समस्या असून काही प्रश्न स्थानिक पातळीवरील असतात. मी नेहमी म्हणतो की राम मंदिरावरचा निकाल सर्वांनी स्वीकारला, कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा होता. त्यामुळे सगळं स्थिर झाल्यानंतर लोक पुन्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त झाले. भूतकाळासाठी सतत न्याय मागत राहणे शक्य नाही. तो विसरणे आवश्यक आहे.” दरम्यान, नृपेंद्र मिश्रा यांनी भूतकाळातील धार्मिक संघर्षांमध्ये गुंतण्याऐवजी समाजाने वास्तव स्वीकारून भविष्यातील विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट संदेश दिला आहे. मंदिराच्या निर्मितीमुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेपेक्षा सामाजिक जबाबदारी आणि प्रगती हाच खरा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.