अयोध्येतील सादातगंज भागात भाजपाचे नवे कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयात उत्तर प्रदेश सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘संदेश’ या त्रैमासिकाचे ढीग पडून आहेत. राम मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ‘संदेश’ या त्रैमासिकाचा विशेष अंक काढण्यात आला होता. ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ मधील या अंकांचे गठ्ठे भाजपा कार्यालयात पडून आहेत. आता राम मंदिराच्या देणगीत भ्रष्टाचार झालेला असताना उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांनी मौन बाळगले आहे. अयोध्येतील भाजपा कार्यालयातील वातावरण सध्या वेगळेच आहे. राम मंदिर देणगीत अपहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु, भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी या प्रकरणापासून भाजपाला दूर ठेवल्याचे दिसते. हे प्रकरण राम मंदिर आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यातील आहे. त्यात भाजपाचा कोणीही प्रतिनिधी नाही, हे सांगण्यावर जोर दिला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर एक वक्तव्य वारंवार ऐकायला मिळते. “योगीजींनी सांगितलं आहे, तुम्ही बघा, कारवाई केली जाईल आणि सगळी व्यवस्था दुरूस्त होईल”, असे वारंवार सांगितले जात आहे. “आमचा जो मूळ मतदार आहे, त्याला माहिती आहे की जे लोक मंदिरापासून दूर राहिले, ते या मुद्द्यावर राजकारण करत आहेत. त्यांना त्यांच्याच मतपेढीवर परिणाम होण्याची भीती आहे”, असे अयोध्या जिल्ह्याचे भाजपा सरचिटणीस मनोज वर्मा म्हणाले. भाजपाच्या महानगर कार्यालयात ते एकमेव उपस्थित होते.
या प्रकरणाचा मतांवर काही प्रमाणात फरक पडेल, कारण कारवाई केली जाईल. चोरी करणाऱ्यांविरोधात जनतेचा रोष आहे, असे सांगत मनोज वर्मा म्हणाले, “कारवाई व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. कारवाई योग्य प्रकारे व्हावी. जेणेकरून या प्रकारचे कृत्य कोणीही करणार नाही. या प्रकरणाचा तपास होईल. योगीजी सोडणार नाहीत”, असे वर्मा म्हणाले.
राम मंदिरासाठी देशात मोठे आंदोलन उभे राहिले होते. राम जन्मभूमि आंदोलन असे त्याचे नाव होते. या आंदोलनामुळे भाजपाचा देशाच्या राजकारणात उदय झाला. दरम्यान, राम मंदिरातील देणगीत चोरी झाल्याचे आरोप झाल्यानंतर भाजपाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. उत्तर प्रदेश सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. तसेच अनेकांना अटक करण्यात आली. विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने भाजपावर जोरदार टीका केली आहे. हे प्रकरण शांत न झाल्यास उत्तर प्रदेशात होणाऱ्या २०२७ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या देशातील लोकसभा निवडणुका, यात भाजपावर परिणाम होऊ शकतो.
“त्यांनी रामाचा पैसा घेतला, पण योगीजी मोदीजी सगळं ठीक करतील”
अयोध्येतील सिव्हिल लाइन्स भागात काही नव्या कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर भाजपाचे जुने कार्यालय आहे. या कार्यालयात भाजपाचे अनेक पदाधिकारी तसेच ग्राम प्रधान उपस्थित होते. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर सोशल मीडियावर काही पोस्ट करू नये, असे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे मन अस्वस्थ असले तरी आपण विरोधकांना उत्तर देण्याआधी सरकार काय कारवाई करतं याची वाट पाहत आहोत, असे उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“हा आमचा मुद्दा नाही. राम मंदिराशी संबंधित अधिकारी व ट्रस्टने काय चुकलं आणि कुठे चुकलं याचं स्पष्टीकरण द्यावं. या सगळ्या प्रकरणात भाजपाचं कोणी आहे का?”, असा सवाल एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. आपणही १९९० पासून राम मंदिर आंदोलनात सहभागी होतो, असे ते म्हणाले. गावागावांतून विटा गोळा करत असताना, एकत्रितपणे पुजा होत असताना आणि पवित्र शिळा अयोध्येत आणल्या जात असताना पाहिल्या. तसेच ज्यावेळी वादग्रस्त भाग पाडण्यात आला तेव्हाही आपण उपस्थित होतो, असे या भाजपा नेत्याने म्हटले.
“खेडेगावातून देणगी घेऊन जाताना एखाद्या नशा करणाऱ्याला…”
राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या तसेच सध्याच्या परिस्थितीवर नाराज असलेल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटले, “बरंच काही आता बदललं आहे.” तर तरूण कार्यकर्त्यांनी देणगीसाठी घरोघरी जाऊन पैसे गोळा केल्याचा अनुभव सांगितला. “खेडेगावातून देणगी घेऊन जाताना एखाद्या नशा करणाऱ्याला जरी सांगितलं की आम्ही देणगीचे पैसे घेऊन जातोय, तर तो त्या पैशांना हात लावण्याचीही हिंमत करत नव्हता. पण, या प्रकरणात त्यांनी रामाचे पैसे घेतले आहेत. आम्ही सध्या यावर काहीच बोलू इच्छित नाहीत. एकदा कारवाई झाली की आम्ही योग्य प्रतिसाद देऊ. पहिल्यांदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येत झालेल्या पराभवाचा आम्हाला धक्का बसला. त्यानंतर पुन्हा हा धक्का बसला आहे. पण, या चुका आम्ही २०२७ मध्ये पुन्हा होऊ देणार नाही”, असे भाजपाच्या एका तरूण पदाधिकाऱ्याने सांगितले.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांमध्ये किंवा चहाच्या टपरीवर या प्रकरणाची चर्चा सुरू असताना कोणाचीही बाजू घेण्याचे टाळले जात आहे. कारण, सध्याच्या परिस्थितीत कोणाचाही बचाव करणे अयोग्य ठरू शकते. “योगीजी, मोदीजी ठिक करतील”, इतकंच बोलून विषय संपवला जात आहे. अयोध्येतील स्थानिक भाजपा नेते राजेश सिंग म्हणाले, “योगीजी व मोदीजी सगळं काही ठीक करतील असा विश्वास लोकांना आहे.” अयोध्या भाजपाचे सरचिटणीस विपीन सिंग म्हणाले, “लोक दु:खी आहेत. पण, त्यांच्या श्रद्धेत काहीही कमतरता नाही. प्रत्येकाला विश्वास आहे.”
भाजपाचे अयोध्या जिल्हाध्यक्ष राधे शाम त्यागी म्हणाले, “ही घटना घडली हे सत्य आहे. पण, तात्काळ कारवाई करण्यात आली. माहिती समोर येताच एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीने त्यांचा अहवाल सोपवला की दोषींना शिक्षा दिली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही.”
