Ram Mandir Donation Scam Triggers Political Storm in UP : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीत मोठा अपहार झाल्याच्या आरोपांमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला घेरण्याची रणनीती आखली आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी राम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहारावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठी मोहीमच उघडली असून काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीनेही या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे राम मंदिराच्या मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या भाजपाला आता त्याच मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.

श्रीराम मंदिराचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी

सध्या उत्तर प्रदेशातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अयोध्या, काशी विश्वनाथ, महाकुंभ तसेच धार्मिक पर्यटनाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यातच राम मंदिरातील देणगीत झालेल्या अपहाराच्या आरोपांमुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे राजकीय गांभीर्य मंदिर उभारणीसाठी झालेल्या जनसहभागामुळे अधिकच वाढले आहे. देशभरातील लाखो रामभक्तांनी मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची देणगी दिली होती. रोख रकमेबरोबरच अनेक भाविकांनी श्रद्धेपोटी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही अर्पण केल्या होत्या. २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठेनंतर श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतर बांधकामासाठी जमा झालेला निधी आणि मंदिरातील दैनंदिन देणगीचा निधी स्वतंत्र खात्यांमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, अलीकडील आरोपांमुळे श्रीराम यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या देणग्यांच्या पारदर्शकता आणि सुरक्षिततेबाबत भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

योगी आदित्यनाथ यांची भूमिका काय?

भाजपामधील काही नेतेही मान्य करतात की, एसआयटी चौकशीचा अंतिम निष्कर्ष काहीही असला तरी या वादामुळे श्रीराम मंदिरातील देणगीचा हिशोब ठेवला जातो का, अशी शंका भाविकांच्या मनात निर्माण झाली आहे. भाजपाच्या एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, हा मुद्दा भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असल्यामुळे त्याचे लवकरात लवकर निराकरण झाले पाहिजे. अन्यथा उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे परिणाम होऊ शकतात. या वादाचे राजकीय गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा भाजपाच्या व्यापक हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडील एका जाहीर सभेत त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे खुले आव्हान दिले आहे.

कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख

“आता मथुरेबाबत बोला,” असे म्हणत जर अखिलेश यादव स्वतःला धार्मिक नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाला उघडपणे पाठिंबा द्यावा, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणात आदित्यनाथ यांनी १९९० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या सरकारच्या काळात पोलिसांनी कारसेवकांवर केलेल्या गोळीबाराचाही उल्लेख केला. राम मंदिर आंदोलनाला विरोध करणारे, प्रभू रामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किंवा रामभक्तांवर गोळीबाराचे आदेश देणारे पक्ष आता अचानक प्रभू रामांविषयी श्रद्धा व्यक्त करत असल्याची टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे- भाजपाच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून समाजवादी पार्टीला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

विरोधकांनी भाजपाची कशी कोंडी केली?

श्रीराम मंदिरातील देगणीतील अपहाराचा कथित मुद्दा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात असला तरी विरोधकांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाविकांच्या भावनेशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास अयोध्येचा विकास ‘सियाराम धाम’ म्हणून केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुसरीकडे- काँग्रेसनेही या मुद्द्याला राजकीय स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील चार खासदारांसह प्रभावशाली नेत्यांनी नुकताच अयोध्येचा दौरा केला. मात्र, काँग्रेसच्या नऊ सदस्यीय शिष्टमंडळाला प्रशासनाने मंदिरात जाण्यापासून रोखले आणि एका शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आले, असा आरोप पक्षातील नेत्यांनी केला. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ न दिल्यास आपण उपोषणाला बसणार, असा इशाराही काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात आला. भाजपा सरकार एकीकडे भाविकांना दर्शनापासून रोखत आहे, तर दुसरीकडे मंदिर देणगीतील गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनीही या मुद्द्यावर आवाज उठवण्यास सुरुवात केल्याने भाजपाची चोहोबाजूंनी कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपाला निवडणुकीत मोठा फटका बसणार?

श्रीराम मंदिरातील देगणीत झालेल्या कथित अपहारामुळे उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष बाब म्हणजे, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी विरोधी पक्षांतील बहुतांश नेत्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे अयोध्येतील मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भाजपाला बहुतांश राज्यात आपले वर्चस्व निर्माण केले. यादरम्यान भाविकांच्या देणग्यांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी भाजपाला घेरण्याची रणनीती अवलंबली आहे. भाजपासमोर आता केवळ विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचेच नव्हे, तर देशभरातील कोट्यवधी भाविकांचा विश्वास कायम राखण्याचेही मोठे आव्हान आहे. रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर स्वरूपातील देणग्यांमुळे राम मंदिराची उभारणी झाली असून, त्याच देणगीवर मंदिराचे व्यवस्थापनही अवलंबून आहे. त्यामुळेच हा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढणे हे भाजपासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा हा मुद्दा भाजपा कसा खोडून काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.