नागपूर : राज्याच्या राजकारणात सत्तासमीकरणे बदलली की आरोपांचे स्वरही बदलतात. मात्र काही आरोप केवळ राजकीय प्रतिक्रिया नसतात; ते आगामी घडामोडींचे संकेतही ठरतात. विदर्भातील शेतकरी नेते व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अलीकडेच केलेला आरोप अशाच प्रकारचा मानला जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच भाजपचे काही लोक असू ते पक्षाला आतून कमकुवत करीत आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादीतील भाजपचे लोक नेमके कोण?’ हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
विदर्भातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विचार केला तर अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले हे मुळचे भाजपचे आहेत आणि विशेष म्हणजे ते गोंदिया जिल्ह्यातील आहेत, त्यामुले कडूंचा आरोप महत्वपूर्ण ठरतो. बच्चू कडू यांच्या आरोपाला भाजप विरोधी किनार आहे, कारण या पक्षाचा अनुभव आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हा कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असूनही शिंदेसोंबत गेले होते, भाजपच्या पाठिंब्याने तयार झालेल्या सरकारमध्ये त्यांना स्थान नव्हते. ऐवढेच नव्हे तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपने पराभव केला होता. त्यामुळे कडू यांना भाजपचा चांगला अनुभव आहे व त्याच अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादीला सावधगिरीचा सल्ला असावा. असे असले तरी ‘राष्ट्रवादीतील भाजपचे लोक ’ हा कडू यांच्या आरोप, हा दादांच्या निधनानंतर पूर्व विदर्भाकडे होणाऱ्या अंगुलीनिर्देशामुळे महत्वाचा ठरतो. याबाबत माहिती घेतली तर एका आमदाराचे कनेक्शन भाजपशी जुळते. त्यांचे नाव आहे राजकुमार बडोले. ते सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
मात्र ते मुळचे कट्टर भाजप वाले. २०१४-२०१९ मध्ये ते फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला होता. पण २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये अर्जुनी मोरगाव या जागेवर राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना भाजपने दावा केला. नुसता दावाच केला नाही तर शेवटपर्यंत या जागेसाठ आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि उमेदवार भाजपचा असा तोडगा निघाला. भाजपचे राजकुमार बडोले हे घड्याळ चिन्हावर लढून राष्ट्रवादीचे आमदार झाले. ‘पक्ष कोणता आणि राजकीय निष्ठा कोणाकडे’ हा प्रश्न चर्चेत येणे स्वाभाविक ठरले. सध्या तरी ते राष्ट्रवादीतील भाजपचे प्रतिनिधी ठरतात. अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात येतो व या जिल्ह्याचे एक बडे नेते अजित दादांच्या निधनानंतर अधिक सक्रिय झाल्याने चर्चेत आले. त्यांची ही सक्रियता भाजपदर्जिणी असल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी मांडलेला राष्ट्रवादीतील भाजपचे लोक हा मुद्या येथे लागू होतो.
राजकीय तडजोड की रणनीती?
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर, युती आणि तात्पुरत्या राजकीय तडजोडी नवीन नाहीत.राजकारणात असे अनेकदा घडते. भाजपमधून इतर पक्षात गेलेले अनेक नेते नंतर कट्टर भाजपविरोधी म्हणून नावारुपास आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील नेते नाना पटोले हे त्यापैकीच एक. बडोले भाजपमध्ये असताना ते निष्ठावान म्हणूनच ओळखले जात आणि राजकीय तडजोडीतून ते राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या पक्षनिष्ठेवर कोणीच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. त्यामुळे केवळ भूतकाळातील पक्षीय संबंधांवरून एखाद्याच्या वर्तमान निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कितपत योग्य, हा मुद्दाही समोर येतो. मात्र अजितदादा यांच्या अपघाती निधनामुळे सर्वच चित्र बदलले आहे. राष्ट्रवादी हा महायुतीचा घटक असल्याने आणि भाजप हा या युतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याचा राजकीय परिणाम काय होईल याची जाणीव भाजपला असल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीतील त्यांची माणसे कामी लावली असावी,असे बच्चू कडू यांना वाटते, त्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

