आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताच माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळाले… माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करत काँग्रेसने अखेर विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला… विधानपरिषद उमेदवारीत डावलल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावशाली नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तर केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला… गोकुळ दूध संघातील प्रशासक नियुक्तीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद तीव्रतेने समोर आले. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
बच्चू कडूंना विधानपरिषदेची लॉटरी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यादरम्यान शिंदे गटात प्रवेश करताच बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्याचे यावेळी बच्चू कडू म्हणाले. शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल-परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पक्षाची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे करत राहू, पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभे राहिले आणि आता त्याच्या बळकटीकरणासाठी काम झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
ठाकरेंच्या निर्णयाला अखेर काँग्रेसचा पाठिंबा
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानपरिषद निवडणुकीतून आपला पक्ष माघार घेणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून ठाकरेसेनेचे उमेदवार अंबादास दानवे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी दानवे यांचे नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी दिले होते. विधानसभेत महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असल्यामुळे ठाकरे गट, शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेसला मिळून एकच उमेदवार देण्याचा पर्याय होता. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. मात्र, ठाकरे यांनी निवडणुकीपासून दूर राहत अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली होती. अखेर काँग्रेसने दानवे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
ठाण्यातील प्रभावशाली नेता शिंदेसेनेच्या वाटेवर?
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रभावशाली नेते आनंद परांजपे यांचे नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, पक्षाने ऐनवेळी झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावलले. यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली. या घडामोडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली. सरतेशेवटी खुद्द परांजपे यांनी सर्व अफवांचे खंडण करीत याबाबत स्पष्टीकरण दिले. “मी शिंदेसेनेत जाणार या केवळ अफवा आहेत. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांची विविध कामानिमित्ताने भेट होत असते, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली. परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकसंध शिवसेनेतून केली. सुरुवातीला ते ठाण्याचे आणि त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. पुढे पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली आणि ठाणे-कल्याण भागात पक्ष संघटन उभारण्यावर भर दिला.
खासदार संजय राऊत यांचे मोठे भाकीत
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तर केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीचेच सरकार येणार, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून केला. पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. त्याआधी विविध मतदानोत्तर चाचण्यांनी पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाचेच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याबाबत माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर केरळमध्ये काँग्रेस आघाडी निवडणूक जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे गटाने विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करताच काँग्रेसनेही या निवडणुकीत आपला उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. त्याबाबत बोलताना, २०२९ मध्ये जर संधी प्राप्त झाली तर काँग्रेसचाच पंतप्रधान होणार. त्याला प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा असेल. त्यामुळे राज्याराज्यातील प्रादेशिक पक्ष हे अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असे वातावरण तयार करणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात अथवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला.
कोल्हापुरात भाजपा-राष्ट्रवादीत मतभेद
गोकुळ दूध संघातील प्रशासक नियुक्तीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद तीव्रतेने समोर आले. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या वादात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मध्ये मतभिन्नता दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वरील प्रमाणे परस्पर विरोधी भूमिका मांडताना आपलेच मत खरे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गोकुळच्या सभासद, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
