भाजपाचे खासदार आणि कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी एकापाठोपाठ एक महापंचायत आयोजित केल्या जात आहेत. यामुळे हरियाणा आणि आसपासच्या परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागच्या चार दिवसांत उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर, हरियाणाच्या कुरुक्षेत्र आणि सोनिपत जिल्ह्यात तीन महापंचायती पार पडल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कुस्तीपटूंनी राजस्थानमध्ये जाऊन आंदोलन करावे. त्याठिकाणी त्यांना पाठिंबा मिळू शकतो. राजस्थानमध्ये येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे या राजकीय वातावरणाचा कुस्तीपटूंच्या आंदोलनाला फायदा होऊ शकतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ मे रोजी दिल्लीमध्ये पोलिसांनी बळाचा वापर करून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेचच कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी तीन महापंचायत आयोजित करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हुसकावल्यानंतर कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याची भूमिका जाहीर केली, त्यानंतर कुस्तीपटूंच्या बाजूने भावनेची एक लाट तयार झाली. सध्या सुरू असलेल्या आंदोलनातील आघाडीचे कुस्तीपटू हे हरियाणामधील ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात या विषयावर आधीच संतापाची लाट होती, हे लोण आता इतर परिसरातही पोहोचले आहे.

हे वाचा >> आंदोलक कुस्तीपटूंची मध्यरात्री अमित शाहांबरोबर प्रदीर्घ बैठक; आज अल्टिमेटम संपणार, पदक विसर्जित करणार की निर्णय बदलणार?

रविवारी सोनिपत जिल्ह्यातील मुंडलाना गावात महापंचायत आयोजित करण्यात आली होती. दलित नेते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) नेते जयंत चौधरी यांनीही कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विविध परिसरातून लोक या महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. शेतकरी आणि खाप नेते या महापंचायतीला संबोधित करत आहेत. महापंचायतींनी कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविला असून कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे.

हरियाणामधील विरोधकांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर याआधीच आक्रमकपणे भूमिका घेतलेली असून भाजपा-जेजेपी आघाडी सरकारवर टीका केली आहे. हरियाणा सरकारने कुस्तीपटूंच्या विषयाला योग्यरितीने हाताळले नसल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी या संवेदनशील विषयावर भाजपाचे नेते मौन बाळगून का आहेत? असा सवाल उपस्थित करून त्यांना कोंडीत पकडले आहे. कुस्तीपटूंना वाढता पाठिंबा पाहता विरोधकांना हरियाणा सरकराच्या विरोधात राळ उठविण्यासाठी आयतेच कोलीत हाती लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हे वाचा >> कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतली? साक्षी मलिक खुलासा करत म्हणाली…

कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा वाढता दबाव पाहता मनोहरलाल खट्टर सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. काही नेते वगळता राज्य भाजपाने कायद्यावर हा प्रश्न सोडला असून तपास यंत्रणाचा याचा निर्णय घेतील, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी मागे बोलताना कुस्तीपटूंच्या निषेध आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, “हा विषय हरियाणा सरकारच्या अखत्यारित येत नाही. केंद्र सरकार आणि खेळाडूंच्या टीममधील हा वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Back to back mahapanchayats in support of wrestlers protest raise political heat in haryana satya malik suggest go to rajasthan kvg
First published on: 05-06-2023 at 17:55 IST