जयेश सामंत, सागर नरेक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण होतो आहे. या आठवडाभरात एकनाथ शिंदे यांनी ट्वीटर, फेसबुक, यूट्युब आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपली भूमिका राज्याला सांगितली. त्यांच्या बंडाच्या दुसऱ्या दिवसानंतर समर्थक आमदार आणि त्यांचे समर्थकही उघडपणे बोलू लागले. मात्र या सर्व घडामोडीत एक गोष्ट अगदी प्रकर्षाने समोर आली आहे ती म्हणजे शिंदे  यांचे आणि त्यांच्या गटाचे मत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भूमिका राज्यभर पसरवण्यासाठी एक नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली जात आहे. कुणी काय बोलावे, कसे बोलावे, फलकांवर मजकूर काय असावा या सर्वांसाठी एक मोठी यंत्रणा सक्रीय असून ती ठाण्यातून राबिवली जात आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे या यंत्रणेचा ताबा असून ते सुरुवातीपासूनच ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानातून यावर लक्ष ठेवून आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या  पहिल्या दिवशी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे प्रवक्ते यांच्याकडून ठोस प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. मात्र बंडाची व्याप्ती, बंडखोर आमदारांची संख्या आणि बंडाचे परिणाम लक्षात येताच बुधवारपासून शिवसेनेकडून बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर विविध माध्यमातून हल्ले करण्यात आले. या सर्वांमध्ये प्रचार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या बंडाची भूमिका राज्यभरात आणि विशेषतः शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नियोजनबद्ध यंत्रणा उभारली आहे.

पहिल्या दिवशी एकाच बाजूने शक्यतांवर आणि सूत्रांच्या मार्फत माहितीचा प्रचार केला जात होता. मात्र दुसऱ्या – तिसऱ्या दिवसापासून शिंदे यांच्या गटाने ठाणे आणि आसपासच्या शहरातील महत्त्वाच्या फलकांच्या जागा ताब्यात घेतल्या. अनेक जुने फलक काढण्यात आले. कोणता संदेश, कशा माध्यमातून पोहोचवायचा याचेही नियोजन केले. बंडाच्या तिसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद  दिघे यांच्या विचारसरणीचा मुद्दा पुढे करत भावनिक वातावरण तयार करण्यात आले. तसे फलक लावण्यात आले. ट्विटरच्या माध्यमातून कोणता संदेश द्यायचा याचेही नियोजन करण्यात आले. यासाठी ठाण्यात स्वतंत्र गट काम करत आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे सुरत अथवा गुवाहाटीला गेले नाहीत. ते ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानातून या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटरवर कोणता मजकूर प्रकाशित करायचा याबाबत नियोजन केले जाते. वेळेप्रसंगी एकनाथ शिंदे स्वतः या  गटाशी संपर्कात असतात. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार, आमदारांचे स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे कोणता मजकूर प्रसारित केला जाईल याबद्दलही मार्गदर्शन केले जाते अशी माहिती आहे.  

स्थानिक संवाद खासदार डॉ. शिंदेंमार्फत

गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांची जनसंपर्क मोहीम यशस्वीपणे राबवण्यासोबतच स्थानिक पालिकांचे माजी नगरसेवक, जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी यांच्याची संपर्क ठेवत त्यांची भूमिका जाणून घेणे आणि त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे ठाण्यात सक्रीय आहेत. राज्यातील विविध मतदारसंघातील आमदारांच्या स्थानिक पदाधिकारी, नेते आणि  यंत्रणेशी डॉ. शिंदे संपर्क करत आहेत. ठाण्यातील चारवेळा नगरसेवक असलेल्या एका नेत्याला आपल्याकडे वळवण्यासाठी डॉ. शिंदे यांनी मोठी कसरत केली. या नगरसेवकाला आपल्या गोटात ओढले नसते तर फाटाफूट होऊन या बंडाचा आत्मा असलेले आनंद दिघे यांचे टेंभीनाका येथील कार्यालय शिंदेंपासून दूर झाले असते. त्यामुळे यासाठी ठाण्यातून डॉ.  श्रीकांत शिंदे सक्रीय आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Background of eknath shindes rebal is created from thane print politics news pkd
First published on: 26-06-2022 at 12:27 IST