नागपूर : वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि जनक्षोभ उसळल्यानंतर माफी मागयची, असे धोरण अलिकडच्या काळात वाचाळवीरांची अवलंबिले आहे. यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर असणारे राजकीय नेते लोकसंतापाचे बळी ठरू लागले आहेत. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

शुक्रवारी नागपुरात भारतदुर्गा मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर सहभागी होताना बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले “ छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अनेक युद्ध करून थकले, तेव्हा ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपला राजमुकुट रामदास स्वामींना देऊन राजपाट सांभाळण्याची विनंती केली,”,बाबाच्या विधानावर शिवप्रेमीं संतापले. त्यानी बागेश्वर बाबाविरोधात आंदोलन तर केलेच, शिवाय फडणवीस व गडकरींही त्यांच्या निशान्यावर आले. भाजप नेत्यांनी बाबांना का रोखले नाही, असा सवाल केला.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत वक्तव्यावर आश्चर्य

बागेश्वर बाबाच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली. संघटनेचे नागपूर शहर अध्यक्ष प्रताप पटले यांच्या नेतृत्वात रविवारी छत्रपती चौकात बागेश्वर बाबाविरोधात जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी प्रताप पटले यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भोंदू बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल
बाबत आश्चर्य व्यक्त केले. राज्याचे प्रमुख आणि केंद्रातील मातब्बर मंत्री दोघेही यावेळी काही बोलले नाही हे गंभीर आहे, असे ते म्हणाले. . काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या निमित्ताने भाजप नेत्यांना सुनावले, ते म्हणाले, मनुवादी भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताना बघत राहिली, असे नमुद केले. भोंदूने महाराजांचा अपमान केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्याला का थांबवले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

बागेश्वर बाबाच्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. संतापाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असल्याची जाणीव मुख्यमंत्र्यांनाही झाली. अर्थात बागेश्वर बाबामुळे झालेली त्यांचीही अडचण लपून राहिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासात असा कुठलाच दाखला नसल्याचे सांगितले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी जे महापुरुष असतात, त्यांच्याबाबत अनेक लोककथा तयार होतात, अशी सारवासारवही केली. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमातून समाचार घेतला. राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे आणि ते महाराजांचा अपमान करतात, असे वडेट्टीवार म्हणाले. बागेश्वर बाबानी केलेल्या चार मुलांच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांना खुलासा करावा लागला. साधूृ-संतांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गडकरींचे शेजारी नागपूरकर राजे भोसलेही सतंप्त

नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनीही बाबाचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड सहन केली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून इतिहासाचे विकृतीकरण सहन केले जाणार नाही, असा इशारादिला. विशेष म्हणजे नागपूरकर भोसले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे महाल भागात शेजारी आहे. अनेक कार्यक्रमात ते सोबत असतात.

२०२३ मध्ये ‘अंनिस’च्या आव्हानानंतर नागपुरातून काढला होता पळ

जानेवारी २०२३ मध्ये बागेश्वर बाबाचा दरबार रेशीमबाग मैदानावर पार पडला. त्यावेळी बागेश्वर धाम यांनी दिव्यशक्ती असल्याचा दावा केल्याचा आरोप करीत ‘अंनिस’ने त्यांना आव्हान दिले होते. दिव्यशक्ती असेल तर त्यांनी आम्ही सांगितलेल्या दहा लोकांच्या जीवनाबद्दल माहिती सांगावी. ही माहिती त्यांनी शंभर टक्के अचूक सांगण्या ऐवजी ९० टक्के अचूक सांगितली तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती बागेश्वर बाबा यांना रोख ३० लाख रुपये देईल असे श्याम मानव यांनी म्हटले होते. मात्र, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बागेश्वर बाबा यांनाही तीन लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल, अशी अट श्याम मानव यांनी ठेवली होती. त्यावेळी बागेश्वर महाराज यांनी कुठलेही आव्हान न स्वीकारता स्वत:चा गाशा गुंडाळत नागपुरातून पळ काढला होता.