अंगा-बोलण्यात ग्रामीण ढंगातला इरसाल बेरकीपणा, समोरच्या व्यक्तीच्या पोटात शिरून त्याला आपल्या प्रभावाखाली घेण्याची हातोटी – अर्थात जिथे फायदा तिथेच त्याचा वापर अन्यथा चार शब्द मागे-पुढे सुनावण्यातही मागे-पुढे न पाहण्याचा व्यावहारिकबाणा. राजकारण आणि समाजकारणातील नेमकी हवा ओळखून ती पकडून ठेवण्याचे कसब, हे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वभावगुण म्हणता येतील. राजकारणात महत्त्वकांक्षा ठेवून पुढे-पुढे जाताना गाफीलही राहून चालत नाहीच पण एक मृदू भाव लागतो. सोबतीला पक्षविरहित स्वत:चीही अशी स्वतंत्र यंत्रणा, संघटन असेल तर त्यासारखी जमेची बाजू कोणती नाही, मात्र, त्याचा चपखलपणे वापर करण्यासाठी अंगभूत चाणाक्षपणाच हवा. हे सर्व सोनवणेंकडे होते आणि त्याच सर्व भांडवलावर त्यांनी पंकजा मुंडेंसारख्या मातब्बर नेतृत्वाला पराभूत करून ‘जायंट किलर’ म्हणून ओळख निर्माण केली.

बजरंग सोनवणे यांचा राजकीय प्रवास हा भाजपमधून झालेला. एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला होता. मात्र, विजयासाठी त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. निवडूनही आले. त्यातून राजकीय महत्त्वकांक्षा बळावली. पुढे केज पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्याही निवडणुका लढवल्या. जय-पराजय, असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू राहिला. एकदा पत्नीलाही निवडून आणले. नगर पंचायत निवडणुकीत मुलीलाही त्यांनी राजकारणात उतरवले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळवून सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील वरिष्ठ नेतृत्त्वाशी नाळ घट्ट करून घेतली होती. बीडचे जिल्हाध्यक्षपदी भूषवले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडेंना भाजपकडून उमेदवारी दिली तेव्हा राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले होते. त्यात सोनवणे पराभूत झाले खरे, पण त्यांनी घेतलेल्या साडे पाच लाखांवर मतांची तेव्हा राजकीय वर्तुळात खासी चर्चा झाली होती.

हेही वाचा…सांगलीवरील वर्चस्वासाठी जयंत पाटील, विश्वजित कदमांमध्ये स्पर्धा

सोनवणे यांचे केज व कळंब तालुक्यात मिळून दोन खासगी साखर कारखाने आहेत. सोलापूर भागातही त्यांनी काही कारखाने भाडेतत्त्वार चालवण्यासाठी घेतल्याची कायम चर्चा असते. साखर कारखाना चालवण्याच्या मुद्याआडूनच त्यांनी परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडेंची कोंडी केली होती. राजकन्या विरुद्ध शेतकरी-पुत्र, असा त्यांचा प्रचाराचा सूर होता. मराठा समाजातील मतदान एकगठ्ठा ठेवण्यासह ओबीसी म्हणजे केवळ वंजारीच, असे चित्र निर्माण करणाऱ्या बीडमधील भाजप आणि धनंजय मुंडेंच्या यंत्रणेला गाफील ठेवून इतरही ओबीसी घटकांशी संपर्क ठेवत त्यांची मते आपल्या बाजूला वळवून बजरंग सोनवणे यांनी विजय साकार केला.