संगमनेर : महाविकास आघाडीला मिळणारी राज्यातील राज्यसभेची एकमेव जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेत्यांनीही मोठा आटापिटा केला. या जागेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेत पाठवण्याच्या हालचाली काँग्रेसने केल्या होत्या. मात्र, मोठ्या घडामोडीअंती काँग्रेसने माघार घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आघाडीचे उमेदवार घोषित केले. आघाडीअंतर्गत या स्पर्धेमुळे थोरातांचे राजकीय पुनर्वसन मात्र रखडले.

पक्षाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असलेले थोरात हे काँग्रेसचे एकनिष्ठ मानले जातात. १९८५ मध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवत अपक्ष म्हणून थोरात विधानसभेत पोहोचले. तेव्हापासून आजपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहेत. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर थोरात पवारांसोबत जातील, अशी शक्यता होती. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

मात्र, त्याही वेळी थोरात यांनी काँग्रेस पक्षासोबतच राहणे पसंत केले. स्वतः पवार यांच्यासाठी देखील थोरात यांचा हा निर्णय अनपेक्षित ठरला होता. पुढे २०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडी आकारास आणण्यात राज्यातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, थोरात आणि शरद पवार यांचा मोठा वाटा राहिला. शिवसेनेसोबत जाण्यासाठी सुरुवातीला प्रतिकूल असलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मन वळविण्याचे काम पवार, थोरात या द्वयिनी केले.

थोरात १९८५ पासून पुढे सलग ४० वर्षे संगमनेर मतदारसंघातून विधानसभेत आहेत. यातील जवळपास अर्धा कालखंड ते कृषी, महसूल अशा महत्त्वाच्या मंत्रिपदावर राहिले. याशिवाय मधला काही काळ ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसोबतच थोरात यांचाही धक्कादायक पराभव झाला. या पार्श्वभूमीवर थोरात यांचे केंद्रात पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा मागील वर्षभरापासून होती.

राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच ही चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र एकच जागा असल्याने आघाडीमध्ये या जागेसाठी मोठी चुरस होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत निवडून येणे अनिवार्य असल्याने राज्यसभेची जागा काँग्रेसला आणि पर्यायाने थोरातांना मिळणार असाच कयास होता. राज्य व केंद्रीय नेतृत्वाकडूनही थोरात यांचे नाव जवळपास निश्चित केले होते. अशातच पवारांना उमेदवारी देण्याची मागणी पुढे आली. पवार गटाकडून तीनही पक्षांना केलेल्या विनंतीनंतर अखेर पवारांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्याचा फटका थोरातांना बसला.