चंद्रशेखर बोबडे/ रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस असा परस्पर विरोधी विचारांचा प्रवास करीत अतिशय अल्पकाळात राजकारणात स्वसामर्थ्यावर ओळख निर्माण करणारे राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आधी उमेदवारी नाकारली होती, पण नंतर बदल झाला. उमेदवारी मिळाली आणि धानोरकर हे राज्यातून एकमेव काँग्रेसचे खासदार निवडून आले होते.

धानोरकर एक धडाडीचे युवा नेते म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ओळखले जात होते. संघर्षशील आणि लढाऊ वृत्ती ही त्यांची गुण वैशिष्ट्य. त्यामुळे त्याच्या राजकीय वाटचलीत अनेक अडचणी आल्या. त्यांचा १७ वर्षाचा राजकीय तसा खडतरच. पण संघर्ष करुन त्यांनी त्यावर मात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २०२४ मध्ये वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची घोषणा करून धानोरकर चर्चेत आले होते. तरुण व आक्रमक खासदार म्हणूनही त्यांची सर्वत्र ओळख होती. प्रशासकीय वर्तुळात त्यांचा दबदबा होता. भाजपच्या विरोधात ते अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर येत. लोकसभेतही विविध चर्चेत त्यांचा सहभाग असायचा. मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. विविध पक्षात त्यांची मैत्री कायम होती.

हेही वाचा… कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादी थोरला की धाकटा भाऊ ?

राजकीय जीवनाची सुरूवात त्यांनी २००६ मध्ये शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख म्हणून सुरू केली. २००९ मध्ये त्यांनी सर्वप्रथम वरोरा – भद्रावती विधानसभा निवडणूक लढविली. पण पराभूत झाले. त्यानंतरही पाच वर्षांत संपूर्ण मतदार संघ पिंजून २०१४ ची निवडणूक कॉंग्रेस नेते संजय देवतळे यांच्या पराभव करून जिंकली. नगरपालिका निवडणुकीवरून सेनेतील वरिष्ठांशी मतभेदांमुळे त्यांनी २०१९ मध्ये शिवसेनेना सोडली व कॉंग्रेस प्रवेश केला चंद्रपूर- वणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठीही त्यांना संघर्ष करावा लागला. कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण धानोरकर यांची निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन शेवटच्या क्षणी कॉंग्रेसने उमेदवार बदलून धानोरकर यांना रिंगणात उतरविले. त्यांच्या पुढे भाजपचे हंसराज अहिर यांच्यासारखे प्रबळ उमेदवार होते. या मतदारसंघात मोठ्या संख्येने धनोजे कुणबी समाज आहे. धानोरकर हे याच समाजाचे प्रतिनिधीत्व करीत होते. त्यांच्या रूपात प्रथमच समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळाल्याने धानोरकर यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. राज्यातून कॉंग्रेसला मिळालेली ही एकमेव जागा होय. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या पारंपरिक वरोरा – भद्रावती मतदार संघातून पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही आमदार म्हणून निवडून आणले. भद्रावती नगर परिषदेत धानोरकर यांची सलग १५ वर्षापासून एकहाती सत्ता आहे. यावरून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय शक्तीचा अंदाज येतो.

हेही वाचा… राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त पोटनिवडणुका बंधनकारक आहेत का?

१६ मे रोजी त्यांनी चंद्रपुरातील नवीन बंगल्याचे वास्तुपूजन केले होते. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर काँग्रेस नेत्यांशी राजकीय मतभेद सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मेव्हण्याला ईडीने नोटीस बजावली होती. अशातच प्रकृती अधिक खालवत गेल्याने त्यांना दिल्लीत हलवण्यात आले. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balu dhanorkars fighting nature remained throughout his political journey from shiv sena to congress print politics news asj
First published on: 30-05-2023 at 12:56 IST