Baramati by-poll unopposed: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अन्य पक्षांकडून उमेदवार उभा केला जाणार की ही निवडणूक बिनविरोध होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे. त्यांना आता विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार या सुनेत्रा पवार असणार आहेत. मात्र, अन्य पक्ष उमेदवार उभे करणार की, ही निवडणूक बिनविरोध होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चुरस निर्माण झाली. मात्र, निवडणूक निकालावरून बारामतीतील मतदारांनी अजित पवार यांना भरघोस मते दिली. त्यामुळे युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव झाला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना खासदार पदाचा राजीनामा देवून विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अन्य पक्ष उमेदवार उभा करणार की नाही, याबाबत उत्सुकता असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून या वेळी उमेदवार उभा करण्याची शक्यता नाही. भाजपने गेल्या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. महायुतीतील मित्रपक्षाच्या विराेधात भाजपचाही उमेदवार असण्याची शक्यता नाही. मात्र, उर्वरित पक्षांकडून उमेदवार उभे केले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदारयादी अद्ययावत करण्यात येणार आहे. एक जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदारयादी तयार करण्यात आली आहे. ही मतदार यादी आज, नऊ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर २५ फेब्रुवारीपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक विभागाने दिल्या आहेत. हरकतींची सुनावणी करून अंतिम मतदारयादी दहा मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रांची यादी तयार करताना मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठक घेतली जाणार आहे.