पुणे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू करताना माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिल्याने या पोटनिवडणुकीला कलाटणी मिळाली आहे. मात्र, काँग्रेसची पोटनिवडणूक लढविण्याबाबत अद्यापही ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिका असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तर उमेदवार उभा करण्याची काँग्रेसने तयारी दर्शविली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी ‘रासप’ने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास या पोटनिवडणुकीत रंगत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या येत्या सोमवारी (सहा एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्यापही काँग्रेसने उमेदवार उभा करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यास ‘रासप’च्या पाठिंब्यामुळे या पोटनिवडणुकीला अनपेक्षित वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारामतीत ‘रासप’ची ताकद किती?
भाजप आणि तत्कालीन शिवसेनेच्या पाठिंब्यावर ‘रासप’चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांना चुरशीची लढत दिली होती. मात्र, त्यावेळी तत्कालीन भाजप- शिवसेना युतीचा त्यांना पाठिंबा होता. बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. जानकर यांना मिळालेल्या यशामागे या समाजाची एकगठ्ठा मते होती. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ’रासप’ने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास ही मते निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बारामती विधानसभा मतदार संघात या समाजाची सुमारे ७० ते ८० हजार मते आहेत. त्यामुळे या मतांचे ध्रुवीकरण झाल्यास लढत चुरशीची होऊ शकते. आता जानकर यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेनंतर काँग्रेस कोणता निर्णय घेणार, यावर या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने उमेदवार उभा केला नाही, तर आमच्या पक्षाचा उमेदवार असणार नाही. मी स्वत: विधानसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. – महादेव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू
पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, मेखळी, जळगाव, कऱ्हावाघज, मोरगाव, तरडोली आदी मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
आतापर्यंत पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये जतमधील सतीश कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाकडून, सांगोल्यातील राघू घुटूकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. साताऱ्यातील शरद भिसे, बुलडाणा येथील गजानन गवळी आणि उल्हासनगर येथील त्रिशला कांबळे यांनी अपक्ष उमेदवारीअर्ज भरला आहे. पाचही उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत.
