पुणे : बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली, तरी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवाराची वानवा असल्याची दिसून येते. पुणे जिल्हा काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी असल्याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविला असला, तरी इच्छुक उमेदवारांबाबत माहिती देण्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत उसुकता निर्माण झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या असणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारीसाठी दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष निवडणूक लढवणार नसेल, तर निवडणूक लढविण्यास तयारी असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविण्यात आला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकित युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव झाला. आता अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार असल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३० मार्च रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा एप्रिलपर्यंत आहे. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून, चार मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार तीन लाख ८३ हजार ७६७ मतदार झाले आहेत. प्रारुप मतदार यादीत तीन लाख ८८ हजार ३७१ मतदार होते. त्यामुळे ७७६३ मतदार हे कमी झाले आहेत.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली. त्यामध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा केला नाही, तर काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची माहिती देण्यात आलेली नाही. निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश पातळीवरून घेतला जाणार आहे. – श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
