पक्षाच्या नेत्यांमधील एकूणच निरुत्साह, लढण्यापूर्वीच पराभूततेची मानसिकता, स्थानिक पातळीवर कमकुवत संघटना हे सारे मुद्दे विचारत घेऊन बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. राज्यसभेपाठोपाठ बारामतीमध्ये पवारांसाठी काँग्रेसला तलवार म्यान करावी लागली आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले होते. काँग्रेसने माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र ॲ़ड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. बारामतीमध्ये निर्धाराने लढण्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे सारे दिग्गज नेते उपस्थित होते. याउलट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह कोणीही नेता फिरकला नव्हता. तेव्हाच काँग्रेस ही पोटनिवडणूक लढण्यावर गंभीर नाही हेच संकेत मिळाले होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक होत असताना काँग्रेसने ती लढविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अन्य पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती.

बारामती लढण्यावरून काँग्रेसमध्ये आधीच दोन मतप्रवाह होते. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ही पोटनिवडणूक लढण्याबाबत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली असता लढण्याबाबत पक्षात फारसा उत्साह जाणवला नाही. प्रचारासाठी नेतेमंडळींनी बारामतीमध्ये जाण्याचे टाळले असते. तसेच माघारीची मुदत संपल्यावर पुढील १० ते १२ दिवस प्रचार करण्याचे मोठे आव्हान होते. बारामती किंवा पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आधीच कमकुवत. विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये लढण्याबाबत फारसा उत्साह दिसत नव्हता.

बारामतीमध्ये अजित पवार हे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होत असत. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. याचा फायदा सुनेत्रा पवार यांना नक्कीच होणार आहे. अशा वेळी लढल्यास निभाव लागणे कठीण होते. पक्षात लढण्यापूर्वीच पराभवाची मानसिकता तयार झाली होती. प्रचारासाठी लागणारी रसद कोण पुरविणार हा प्रश्न होता. दुसरे म्हणजे, पक्षातील पहिल्या फळीतील सारे नेते या पोटनिवडणुकीपासून दूर राहिले होते. यातूनच हात दाखवून अवलक्षण करण्याऐवजी माघार घेतलेली बरी, असा विचार पक्षात पुढे आला.

शरद पवारांमुळे काँग्रेसची दुसरी माघार

राज्यसभेची महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी जागा लढण्याचा काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता. पण शरद पवारांनी पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसला पाठिंबा देण्यास भाग पाडले होते. बारामतीत काँग्रेसने माघार घ्यावी म्हणून शरद पवारांनी पुन्हा खरगे यांच्याकडे शब्द टाकला होता.