पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीतील कोणीच निवडणूक लढविण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत बारामतीबाहेरील तीन जणांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेसने उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविली असून, काँग्रेसच्या भूमिकेवर बारामतीतील निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ३० मार्चपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये जतमधील सतीश कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाकडून अर्ज भरला आहे. साताऱ्यातील शरद भिसे यांनी अपक्ष आणि सांगोल्यातील राघू घुटूकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे हे काम पाहत आहेत.
पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरलेले तिघेही बारामतीबाहेरील आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर आणखी उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित उमेदवार हे अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार, यावर पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेतली जाणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून, चार मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारीसाठी दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसकडेही इच्छुक उमेदवाराची वानवा असल्याचे दिसून येते. भाजप उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकित युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव झाला. आता अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार असल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
