पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, १९९१ नंतर पहिल्यांदाच अजित पवार हे उमेदवार असणार नाहीत. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या असणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार उभा करणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३० मार्च रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा एप्रिलपर्यंत आहे. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून, चार मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
या मतदार संघातून १९९१ मध्ये पाहिल्यांदा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक लढविली. त्यानंतर सलग आठवेळा ते बारामतीतून निवडून आले. त्यामुळे सुमारे ३५ वर्षांनंतर बारामतीतून अजित पवार हे उमेदवार असणार नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार उभा करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अन्य विरोधी पक्षांकडूनही उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. त्यांना आता विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रारुप मतदार यादी नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तीन लाख ८३ हजार ७६७ मतदार झाले आहेत. प्रारुप मतदार यादीत तीन लाख ८८ हजार ३७१ मतदार होते. त्यामुळे ७७६३ मतदार हे कमी झाले आहेत. मात्र, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने या मतदारांवर मतदानाची वेळ येणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकित युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव झाला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार असल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
