पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. बारामतीतील तीन लाख ८३ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याची संधी मिळणार की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची तयारी केली आहे. मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रारुप मतदार यादी नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तीन लाख ८३ हजार ७६७ मतदार झाले आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. त्यांना आता विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार या सुनेत्रा पवार असणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बारामतीकरांना मतदानाचा हक्क बजाविण्याची वेळ येणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अन्य पक्षांकडून उमेदवार उभा केला जाणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
७७६३ मतदार कमी
बारामती विधानसभा मतदार संघाच्या प्रारुप मतदार यादीत तीन लाख ८८ हजार ३७१ मतदार होते. अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या तीन लाख ८३ हजार ७६७ झाली आहे. त्यामुळे ७७६३ मतदार हे कमी झाले आहेत.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकित युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव झाला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार असल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
मतदान केंद्र आणि मनुष्यबळाचीही तयारी करून ठेवण्यात आली आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अन्य पक्षांकडून उमेदवारी अर्ज आला नाही, तर मतदानाची प्रक्रिया करावी लागणार नाही. मात्र, सर्व पातळ्यांवर तयारी करून ठेवण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
