Maharashtra Top 5 Political News: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. बारामतीच्या पोट निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रोहित पवारांनी काँग्रेसची माफी मागितली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक शोषण तसेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे.श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये दाखल झाले. सभेला ते संबोधित करत होते. वाचा ५ महत्वाच्या राजकीय घडामोडी.
संतोष देशमुखांच्या पत्नीचा मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी अर्ज दाखल
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, मस्साजोगची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. “गावकऱ्यांच्या इच्छेनुसार आम्ही अर्ज दाखल केला आहे. संतोष देशमुख यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमावलेलं आहे. मी गावकऱ्यांची सेवा करेन. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. गावकऱ्यांच्या इच्छेमुळेच निवडणुकीत उतरलो आहोत.”, असे अश्विनी देशमुख म्हणाल्या. दरम्यान, अश्विनी संतोष देशमुख याही यापूर्वी मस्साजोगच्या सरपंच राहिलेल्या आहेत. २०१७ ते २०२२ या कालावधीत अश्विनी देशमुख यांनी मस्साजोगच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली होती.
बारामती पोट निवडणुकीतून काँग्रेसची माघार
बारामतीच्या पोट निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोट निवडणूक जाहीर झाली. ही पोट निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला होता. दरम्यान काँग्रेस आज काय करणार हे पाहणं महत्वाचं होतं. कारण आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार होती. आज अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने माघार घेतली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांचं अपघाती निधन महाराष्ट्राला चटका लावणारं आहे. त्यामुळे आम्हाला जी भावनिक साद घालण्यात आली त्याचा विचार आम्ही केला. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विनंती केली . सुनेत्रा पवार यांनी फोन केला होता. अजित पवारांशी काँग्रसचं असलेलं जे नातं होतं, त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.”
पार्थ पवारांच्या वतीने रोहित पवारांची काँग्रेसकडे दिलगिरी व्यक्त
बारामतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे व रोहित पवार यांनी पार्थ यांच्या विधानापासून फारकत घेतली होती. रोहित पवार यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी काँग्रेस विरोधात जी विधाने केली होती, ती चुकीची होती. पार्थच्या वतीने आणि त्याचा भाऊ म्हणून मी काँग्रेसची दिलगिरी व्यक्त केली आहे. काँग्रेसने बारामती पोट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा”, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने बारामती पोट निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिकमध्ये कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, मुख्यमंत्री काय म्हणाले?
नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक शोषण तसेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. बीडमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हे अतिशय गंभीर प्रकरण असून पोलीसांनी ते उघडकीस आणले. अशा प्रकारच्या आयटी कंपनीत दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले, ते अतिशय धक्कादायक आहे. मी पोलीसांचे कौतुक करेन की त्यांनी वेगाने कारवाई करत याचा भांडाफोड केला.”
“धनंजय मुंडेंना मंत्री करा”, मुंडे समर्थकाची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये दाखल झाले. सभेला ते संबोधित करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या एका समर्थकाने भर सभेत मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली. “आम्ही दोन जिल्ह्यांतील सर्व ग्रामस्थांची तुम्हाला मागणी आहे, तुम्ही आम्हाला सांभाळता… आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा. धनंजय मुंडेंना मंत्री करा. तुमचे पन्नास टक्के कामं कमी होतील”, असे मुंडे समर्थक म्हणाला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हास्य करत “सगळ्यांना खूप खूप धन्यवाद” अशी प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमात सुरेश धस व धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. “धनंजय मुंडेंना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न नाही, राष्ट्रवादीचा आहे”, असे सुरेश धस म्हणाले. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेचा संबंध असल्याची टीका झाली होती. त्यामुळे मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
