पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सहानभूतीची लाट असताना काँग्रेसने बारामतीचा ‘विकास’ आणि ‘नेतृत्त्व’ या दोन्ही मुद्यांवरून निवडणूक लढवून मते मिळणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने ‘जातीय ध्रुवीकरणा’चा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविराेधात लढताना जेमतेम चार हजार मते घेतलेले आकाश मोरे हे धनगर समाजाचे नेतृत्त्व करणारे असून, या समाजाची निर्णायक मते असल्याने जातीय ध्रुवीकरण करून निवडणूक लढविण्याची खेळी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात फारसे सक्रिय नसलेले मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. ही लाट थोपवण्यासाठी काँग्रेसला नेहमीप्रमाणे मतदारांना आकर्षित करणारा ‘विकास’ हा मुद्दा घेता येणार नसल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे बारामतीचा कायापालट झाला आहे. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री म्हणून बारामतीसाठी कायम मुबलक निधी उपलब्ध करून देत असत. त्यामुळे प्रचारात बारामतीचा विकास हा मुद्दा मतदारांना भुलवू शकणार नाही.
बारामतीचे नेतृत्त्व हा मुद्दाही चालणार नसल्याचे लक्षात आल्यावर काँग्रेसने मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय समीकरणाचा आधार घेण्याचे निश्चित केले. बारामतीत मराठा समाजानंतर धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने या समाजाची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी आकाश मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले.
बारामतीतील समाजनिहाय मतांचे प्रमाण किती?
- बारामती विधानसभा मतदारसंघात मराठा समाज सुमारे ४५ ते ५० टक्के आहे. मात्र, त्याखालोखाल धनगर समाजाची मते आहेत. ही मते मागील काही निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत आली आहेत. या समाजाची मते सुमारे १५ ते १८ टक्के आहेत. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन ही मते आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे.
- समाजनिहाय मतांमध्ये इतर मागास वर्गाची मते ही तिसऱ्या स्थानावर आहेत. लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास त्यांचा या मतांवर भर राहणार आहे.
- वंचित बहुजन आघाडीची काही पारंपरिक मते आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीत जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आकाश मोरे यांची अनामत रक्कम जप्त
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. ते १९९० मध्ये आमदार होते. त्यानंतर आकाश मोरे यांनी २०१४ मध्ये अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढविली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. अवघी ४०१३ मते त्यांना मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. बारामतीच्या राजकारणात ते फारसे सक्रिय नाहीत. त्यांच्याशिवाय वैभव बुरगुले, रोहित बनकर, डॉ. अर्चना पाटील, विजय भिसे, तुषार ओहाळ यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेसने समाजनिहाय मतांचे ध्रुवीकरण करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
