पुणे : बारामती पोटनिवडणुकीचा निकालाची औपचारिकता असली, तरी यानिमत्ताने काँग्रेस, भाजप आणि दोन्ही ‘राष्ट्रवादी’ या राजकीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक संघटनात्मक बांधणीसाठी बळकटी देणारी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांची मनधरणी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ला करावी लागल्याने राज्यात पकड ढिली झालेल्या काँग्रेसने अस्तित्त्व दाखवून दिले. भाजपचे ‘मिशन बारामती‘चे स्वप्न असून, प्रचाराच्या काळात बुथ कमिट्या कार्यरत झाल्याने भाजपच्या ‘मिशन बारामती’च्या आशा पल्लवित झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे विलीनीकरण होणार की नाही, याबाबतचे चित्र धूसर असले तरी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने पवार कटुंबातील तिसऱ्या पिढीचे नवे नेतृत्व कोण असेल, हे दाखवून दिले. त्यामुळे या प्रमुख चारही पक्षांसाठी बारामतीची पोटनिवडणूक ही बेरजेचे राजकारण करणारी ठरली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. मात्र, निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या निमित्ताने भाजप, काँग्रेस आणि दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने पक्षीय बळकटीसाठी राजकारण केल्याचे दिसून आले.
या पोटनिवडणुकीचा निकाल चार मे रोजी जाहीर होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नाही. २२ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे निकालाची औपचारिकता बाकी आहे. मात्र, या निमित्ताने काँग्रेस, भाजप आणि दोन्ही ‘राष्ट्रवादी’ या प्रमुख पक्षांनी आपापल्या पक्षांची संघटनात्मक बांधणी करून घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने पायाभरणी करणारी ठरली आहे.
काँग्रेसचे पुनरुज्जीवन?
गेल्या काही वर्षांत बारामती आणि पुणे जिल्ह्यात काँग्रेसची पकड ढिली झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत आली आहे. मात्र, या पोटनिवडणुकीने काँग्रेसने आपले अस्तित्व दाखवून दिले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडे दोन्ही ‘राष्ट्रवादी’ला मनधरणी करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही संवाद साधला. त्यामुळे काँग्रेसचे महत्त्व वाढले. काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याने राज्यात काँग्रेसची चर्चा झाली.
भाजपच्या ‘मिशन बारामती’च्या आशा पल्लवित?
भाजपचे ‘मिशन बारामती’ हे स्वप्न आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बारामतीत हजेरी लावली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्यांनी प्रचार केला. तसेच भाजपने ही संधी साधून बुथ कमिट्या सक्रिय केल्या. बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी भोर आणि पुरंदरमधील काँग्रेसचे माजी आमदार अनुक्रमे संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खडकवासला आणि दौंड मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. इंदापूरमध्ये भाजपने सोनई उद्योग समूहाचे संचालक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने यांना प्रवेश दिला आहे. आतापर्यंत बारामती विधानसभा मतदार संघात भाजपला शिरकाव करता येत नव्हता. आता प्रचाराच्या काळात भाजपने पन्ना प्रमुख, बुथ कमिट्या सक्रिय केल्याने भाजपच्या ‘मिशन बारामती’च्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पवार कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांसाठी ही पोटनिवडणूक पवार कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय करणारी ठरली. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार; तसेच खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी प्रचाराच्या निमित्ताने बारामतीकरांशी संवाद साधला. बारामतीचे नवे नेतृत्त्व कोणाच्या हाती जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली. पवार कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय झाली.
