पुणे : बारामती विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नसलेली ही पहिलीच निवडणूक आहे. मताधिक्याचा विक्रम करण्यासाठी महायुतीने प्रचार केला असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही महायुतीच्या उमेदवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे बारामतीतील तीन लाख ७३ हजार मतदार इतिहास घडविणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये बारामतीतीलच आठजण, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे.
या मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तीन लाख ८३ हजार ७६७ मतदार झाले आहेत. प्रारुप मतदार यादीत तीन लाख ८८ हजार ३७१ मतदार होते. त्यामुळे ७७६३ मतदार हे कमी झाले आहेत. या मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी तयारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी संपर्क साधला. भाजपनेही बुथ कमिटीच्या माध्यमातून प्रचार केला. शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारीही प्रचारात सामील झाले.
अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले यांचे विक्रम
बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. ते २०१९ मध्ये एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजयी झाले होते. अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. अजित पवार हे सलग आठवेळा बारामतीतून निवडून आले. त्यांपैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांनी एक लाखांहून अधिक मतांनी विजय साकारला. २००९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन तावरे यांच्यावर एक लाख दोन हजार ७९७ मताधिक्याने विजयी मिळविला. २०१९ मध्ये पडळकर यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केल्यावर २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव केला.
सातारा विधानसभा मतदार संघातून २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे एक लाख ४२ हजार मताधिक्याने निवडून आले. त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमित कदम यांचा पराभव केला. आता बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
