पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विविध पातळ्यांवर प्रयत्न करून काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडले; पण तरीही २३ उमेदवार रिंगणात राहिल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही. काँग्रेसच्या उमेदवाराच्या माघारीसाठी शक्ती पणाला लावत असताना, पवार यांच्या बारामतीतीलच आठजण हे बिनविरोध निवड होण्यास अडथळा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील उमेदवार आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची उमेदवारी मागे घेण्यात अपयश आल्याने ‘युद्धात जिंकले; पण तहात हरले’ अशी स्थिती ‘राष्ट्रवादी’ची झाल्याने आता मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सोपस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना करावे लागणार आहेत.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बुधवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ४७ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी २४ जणांनीच अर्ज मागे घेतले. उर्वरित २३ जणांचे मतपरिवर्तन करण्यात ‘राष्ट्रवादी’ला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्यांमध्ये नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत.
आठ बारामतीकर कोण?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्यात बारामतीतील आठजण कारणीभूत ठरले आहेत. अविनाश गायकवाड, चंद्रकांत वाघमोडे, रोहित भोसले, मिथुन आटोळे, मंगलदास निकाळजे, विजयकुमार भिसे, विराज शिंदे, साजन आडसुळ हे आठजण अपक्ष उमेदवार आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यात ‘राष्ट्रवादी’ला अपयश आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्यात बारामतीकरच अडथळा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
करुणा मुंडे अपक्ष उमेदवार
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, हा पक्ष नोंदणीकृत राजकीय पक्ष नसल्याने त्या अपक्ष उमेदवार असणार आहेत. त्यांचे मतपरिवर्तन न झाल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
प्रत्येक निवडणूक लढविणारे अभिजित बिचुकले
लोकसभा, विधानसभेपासून नगरपंचायतींपर्यंतच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक बिनविरोध होण्यापासून रोखणारे ‘बिग बॅस’मराठीतील अभिजित बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांनी माघार घेतली नाही. विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून अभिजित बिचुकले हे कायम चर्चेत रहात असतात.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी मतदार संघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. सातारा येथूनही त्यांनी अर्ज भरला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. २०१९ आाणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
कृषीमंत्री भरणेंच्या गावातील उमेदवार
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर येथील भरणेवाडीतील बाळा धापटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या निवडणुकीत आता मतदानापासून मतमोजणीपर्यंतचे सोपस्कार करावे लागणार आहेत.
