पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून वेगवेगळे रंग दाखविण्यात येत असताना प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने युवा नेते जय पवार यांच्यावर सोपविली. काँग्रेसविषयी विधानामुळे वादात सापडलेले नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांना ‘राष्ट्रवादी’ने प्रचारापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जय पवार यांनी बारामतीत गावोगावी हिंडून मतदारांशी संपर्क साधल्याने आगामी काळातील बारामतीतील ‘नवे नेतृत्व’ म्हणून जय पवार यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जय पवार यांनी गावोगावी भेटी देण्याचा धडाका लावला. नऊ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. काँग्रेसने माघार घेतली, तरी २३ उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने प्रचाराची औपचारिकता करावी लागली. मंगळवारी (२१ एप्रिल) प्रचाराची सांगता होणार आहे. या काळात जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातील गावोगावी भेटी देत मतदार संघ पिंजून काढला.
पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने उमेदवार घेत नसल्याचे दिसताच खासदार पार्थ पवार हे संतापले. त्यांनी ‘काय करायचे, ते त्यांना कळायला हवे. त्यांना काय करायचे ते करू द्या; पण नंतर काय त्रास होईल ते महाराष्ट्रात दिसेल.’ अशा शब्दांत काँग्रेसला इशारा दिला. त्यावरून ते वादात सापडले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पार्थ पवार यांच्या वक्तव्यानंतर नाराजी दर्शविली. काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, पार्थ पवार यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. त्याचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात पडू नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने प्रचाराची धुरा युवा नेते जय पवार यांच्यावर सोपविली. प्रचाराच्या काळात पार्थ पवार यांनी पडद्यामागे राहून सूत्रे हलविली. या काळात त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांना बारामतीत सक्रिय प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. जय पवार यांनी गावोगावी भेटी देऊन जनसंपर्क वाढवला. त्यामुळे आता बारामतीचे नवे नेतृत्त्व म्हणून जय पवार यांच्याकडे पाहिले जाऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भावनिक साद आणि आठवणींना उजाळा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख ही सकाळपासून कामाला सुरुवात करणारा नेता अशी होती. त्यांच्या या कार्यशैलीची छबी जय पवार यांच्या माध्यमातून प्रचाराच्या काळात बारामतीकरांना दिसून आली. बारामती शहरातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी थेट चहाच्या टपरीवर बसून मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. बारामती तालुक्यातील खांडज, सांगवी, सोरटेवाडी आणि मुरुम यांसारख्या गावांमध्ये जय पवार यांचे दौरे केले. सोरटेवाडी येथे एका चिमुकल्याने अजित पवार यांच्या जीवनावर भाषण केले, तेव्हा जय पवार हे भावूक झाले. सांगावी आणि खांडज येथील सभांमध्ये बोलताना जय पवार यांनी ‘बारामती जसा दादांचा श्वास होता, तसाच तो आमचाही श्वास आहे,’ असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. या प्रसंगांमुळे जय पवार यांच्याविषयी प्रचाराच्या काळात चर्चा होत राहिली.
जय पवार यांचा राजकीय मुरब्बीपणा
जय पवार यांनी प्रचारात हार-तुरे स्वीकारले नाहीत, तसेच प्रचाराला उत्सवी स्वरूप येणार नाही, याची खबरदारी घेतली. कांबळेश्वर येथील ग्रामस्थांनी अजित पवार यांचा आवडता गमछा जय पवार यांना भेट दिला, तेव्हा त्यांनी तो अजित पवार यांच्या स्मारकात स्मृती म्हणून ठेवणार असल्याचे जाहीर केले. खांडजमध्ये कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव गुलाबी रंगाच्या दुचाकीवर बसले. तेव्हा ‘पाडू नको बरं!’ अशी मारलेली मिश्किल कोपरखळी हा प्रसंग चर्चेत राहिला. त्यांनी तरुणांशी संपर्क साधला. सांगवी येथे त्यांनी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस करण्याचा राजकीय मुरब्बीपणाही दाखवून दिला.
