पुणे : बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप मतपेरणी करत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ‘बारामतीत बाहेरून येऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’ असे सांगत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टिप्पणी केल्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही रोहित पवार यांना डिवचले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि भाजप यांच्यात प्रचाराऐवजी संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला गेल्या रविवारी प्रारंभ झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी बारामतीचा दौरा केला. त्यांनी भाजपच्या बुथप्रमुखांचा मेळावा घेऊन सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी ताकदीने प्रचार करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौरा केला. भाजपचे राज्य पातळीवरील नेते हे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांच्या भगिनी सई पवार यांनी बुधवारी कोपरा बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली.
भाजप हे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतपेरणी करत असल्याचा अंदाज आल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘बारामतीत बाहेरून येऊन समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’ अशी टिप्पणी भाजपचा नामोल्लेख न करता केली. चंद्रकांत पाटील हेदेखील बुधवारी बारामती दौऱ्यावर होते. प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ‘आपल्या संस्कृतीनुसार राजकीय मतभेद असले, तरी कुटुंबातील कार्यक्रमामध्ये सर्वजण एकत्र येतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असल्याने आमदार रोहित पवार प्रचार करतील. मात्र, पुढे काय होईल, ते पाहावे लागेल,’ असे सांगत रोहित पवार यांना डिवचले. त्यामुळे आता प्रचाराच्या काळात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपचे ‘मिशन बारामती’
भाजपच्या ‘मिशन बारामती’ला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बारामती हा बालेकिल्ला भेदून बारामती ताब्यात घेणे, हा या मिशनमागील हेतू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत सभा घेतली. मात्र, कुल यांचा पराभव झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मिशन ४५’ अंतर्गत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघ होता. त्यामध्येही भाजपला यश मिळू शकले नाही. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार होत्या. मात्र, सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने भाजपची ‘मिशन बारामती’ मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्यानिमित्ताने भाजपने पुन्हा ‘मिशन बारामती’ सुरू केले. तत्पूर्वी बारामती लोकसभा मतदार संघातील भोर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना भाजपमध्ये घेतले. मात्र, त्यानंतरही बारामती ही ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप मतपेरणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
