पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ या वक्तव्याने बारामतीत पुन्हा एकदा भाऊबंदकी उफाळून आली आहे. आगामी काळात पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील आमदार रोहित पवार, खासदार पार्थ पवार, युगेंद्र पवार की जय पवार या चार पवार बंधूंपैकी कोण बारामतीचे नेतृत्व करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
बारामतीच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा केल्यानंतर आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी रोहित पवार यांनी काँग्रेेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यातून त्यांची राजकीय प्रगल्भता दिसून आली. पोटनिवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी भूमिका बजावली.
रोहित पवार यांचा मतदार संघ कर्जत – जामखेड असला, तरी गेल्या काही महिन्यांपासून ते बारामतीत सक्रिय झाल्याचे दिसून येते. प्रसारमाध्यमांनी याबाबात त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी कर्जत जामखेडमध्येच काम करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा बारामतीतूनच निवडून आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ शिर्सुफळ-गुणवडी गटात निवडून येऊन झाला. त्यामुळे बारामती हे त्यांचे राजकारणातील मूळ असल्याकडे लक्ष वेधले.
नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार हेदेखील बारामतीच्या राजकारणात सक्रिय दिसू लागले आहेत. पोटनिवडणुकीत काँग्रेस माघार घेत नसल्याचे लक्षात येताच खासदार पार्थ पवार यांचा पारा चढला. त्यांनी ‘नंतर काय त्रास होईल ते महाराष्ट्रात दिसेल.’ अशा शब्दांत काँग्रेसला दिलेला इशारा त्यांच्या अंगलट आला. त्या वक्तव्यावरून ते वादात सापडले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पार्थ पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात पडू नयेत, यासाठी त्यांना जाहीर प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. मात्र, पडद्यामागून सर्व यंत्रणा पार्थ पवार हे सांभाळत होते.
युगेंद्र पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविल्यानंतर बारामतीत नवे नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यांनीही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोकसंपर्कावर भर दिला. त्यामुळे आगामी काळात बारामतीची सूत्रे युगेंद्र पवार यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आता जय पवार यांनी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा असल्याचे बोलून दाखविल्यानंतर आता बारामतीत भाऊबंदकी उफाळून आली आहे.
जय पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, असे विधान केले. युगेंद्र पवार यांनी मात्र या विषयावर आता चर्चा करण्याची वेळ नाही. भावा-भावांमध्ये वाद निर्माण करू नयेत, असे आवाहन करून या विषयावर सामोपचाराची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीचे तिसऱ्या पिढीचे नवे नेतृत्व रोहित, पार्थ, युगेंंद्र की जय पवार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
