पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे नेतृत्त्व कोणाकडे, याबाबत चर्चा सुरू झाली असताना, युवा नेते युगेंद्र पवार आणि जय पवार या दोघांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बारामतीकरांशी संपर्क आल्यानंतर जय पवार यांनी सुरू केलेल्या ‘जनता दरबारा’ला प्रतिसाद मिळत असताना युगेंद्र पवार यांनीही बारामतीच्या ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करून ‘गावभेट मोहीम’ सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीचा नवीन नेता कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ असे वक्तव्य केले. पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जय पवार हे पहिल्यांदाच बारामतीकरांच्या संपर्कात आले. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी लोकसंपर्क सुरू ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी आता ‘जनता दरबार’ सुरू केला आहे.

जय पवार हे सक्रिय झाले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनीही पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनीही गाठीभेटींना सुरुवात केली आहे. विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीच्या निमित्ताने युगेंद्र पवार हे पहिल्यांदा बारामतीकरांच्या संपर्कात आले. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली. पराभवानंतरही त्यांनी संपर्क सुरू ठेवला आहे. त्यांनी ‘गावभेट मोहीम’ सुरू केली आहे.

‘गावभेट मोहीम’ या संकल्पनेद्वारे ते बारामती तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान ते ग्रामस्थांशी संवाद साधून जागेवरच समस्या सोडवत आहेत. त्यामुळे त्यांच्या गावभेट मोहिमेला युवक आणि शेतकरी वर्गाकडून प्रतिसाद मिळत आहे.

जय पवार शहरात, तर युगेंद्र पवार ग्रामीण भागात सक्रिय

बारामतीतील ग्रामीण भागातील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. त्या मतदारांचा पाठिंबा मिळाल्यास आगामी काळातील निवडणूक लढविणे सोपे होणार असल्याने युगेंद्र पवार यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. जय पवार हे बारामतीत शहरी भागातील मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यासाठी ते ‘जनता दरबार’ घेत आहेत. ‘जनता दरबार’ आणि ‘गावभेट मोहीम’ ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.