पुणे : बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ हे वक्तव्य चर्चेत राहिले. त्यानंतर ही चर्चा थांबेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच निवडणुकीच्या निकालानंतर जय पवार यांनी ‘जनसंवादा’चा सपाटा लावला आहे. जय पवार हे सक्रिय झाल्याने बारामतीची सूत्रे कोणाकडे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जय पवार विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्यात बारामतीच्या नेतृत्त्वासाठी चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विधानसभेची २०२४ मधील निवडणूक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात लढल्यानंतर युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले. पराभवानंतर त्यांनी गावोगावी संपर्क साधण्यास सुरुवात केली. पोटनिवडणुकीत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र, त्यांची भूमिका ही तटस्थ होती. जय पवार यांच्याकडे पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धुरा होती. त्यांनी प्रचाराच्या काळात ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ असे म्हटल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आगामी काळात पवार विरूद्ध पवार अशी लढत होऊ शकते, अशी प्रतिक्रियाही दिली. मात्र, युगेंद्र पवार यांनी जाहीर वक्तव्य करणे टाळले. जय पवार यांच्या विधानानंतर या विषयावर पडदा पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता जय पवार हे दररोज बारामतीकरांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहेत.

जय आणि युगेंद्र यांच्यात चुरस

युगेंद्र पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविल्यानंतर बारामतीचे नवे नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यांनीही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोकसंपर्कावर भर दिला. त्यामुळे आगामी काळात बारामतीची सूत्रे युगेंद्र पवार यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता जय पवार हे सक्रिय झाल्याने आता जय आणि युगेंद्र यांच्यात नेतृत्वासाठी चुरस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

जय पवार यांच्या ‘जनसंवादा’ची चर्चा

जय पवार यांनी गेल्या मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग सुमारे साडेसहा तास जनसंवाद साधला. तेव्हापासून त्यांच्या ‘जनसंवादा’ची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे ६०० हून नागरिकांनी विविध समस्यांची निवेदने दिली. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी संवाद साधल्याने जय पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.